लागींर झालं जी मालिकेतून अजिंक्य आणि शितलची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. विशेष म्हणजे नितीश चव्हाणने साकारलेला फौजी( अजिंक्य) प्रेक्षकांना खूपच भावला. याच भूमिकेमुळे नितीश अनेक तरुणींना भुरळ घालू लागला. अगदी मालिका सुरू असताना देखील सेटवर आपल्या या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते गर्दी करू लागत असत. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी हे चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना कधीच विसरू शकत नाहीत. आज अशाच एका चाहतीने अचानक एक्झिट घेतल्याचे नितीश चव्हाणला समजले तेव्हा तो खूपच भावुक झाला आणि आपण भेटू शकलो नाही याची खंत देखील व्यक्त केली. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो…

“तुझ्याबद्दल बातमी कळाली खूप वाईट वाटलं. मला माहित न्हावतं तुझ्या हृदयामध्ये छिद्र होत आणि तुझी शेवटची इच्छा मला भेटण्याची होती, हे तर ऐकून पायाखालची जमीनच सरकली. तुझ्याबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं, पण मला तू भेटण्यासाठी काय काय केलंस हे आत्ताच समजलं, ऐकून धक्काच बसला, वाटलं नव्हतं कोणी आपल्याला भेटण्यासाठी एवढं काय काय करेल, खरंच तू ग्रेट आहेस, सलाम आहे तुला. तुझ्यासारखी फॅन होणे अशक्य आहे. माफ कर मला कामामुळे मी तुला भेटू शकलो नाही पण एवढं नक्की सांगेन या जन्मी नाही भेटता आलं पण पुढच्या जन्मी मी तुझा फॅन होऊन नक्की भेटेन तुला. मला एवढं प्रेम दिलंस खुप खुप आभारी आहे तुझा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो….” नितीश च्या या पोस्टने एक चाहती आपल्यासाठी काय काय करू शकते म्हणून भारावून गेला पण त्याच क्षणी ती आज या जगातच नाही हेही सत्य पुरेपूर उमजून चुकला. त्याचसाठी सर्वच कलाकारांनी किमान आपल्या कामातून थोडा वेळ काढून आपल्याला भेटायला आलेल्या चाहत्यांसोबतही घालवायला हवा. कारण न जाणो हे चाहते तुमच्या आयुष्यातही थोडाफार आनंद वाढवायला कारणीभूत ठरू शकतील . चाहत्यांचा प्रतिसाद हीच त्या कलाकारासाठी खरी दौलत आहे हे विसरून चालणार नाही….