अभिनेत्री मृणाल दुसानिस हिच्यासोबत शर्मिष्ठा राऊत हिने सोशल मीडियावर काल एक पोस्ट शेअर करून निर्मात्याने आमचे पैसे दिले नसल्याचा आरोप केला होता. कलाकार नेहमीच आपल्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो परंतु उत्तम काम करूनही त्याचा मोबदला जेव्हा मिळत नाही तेव्हा अगदी भीक मागावी तसे निर्मात्यांकडे स्वतःच्या कामाचे पैसे मागावे लागतात अशी खंत या दोघी अभिनेत्रींनी व्यक्त केली होती. हे मन बावरे या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञानाना त्यांच्या कामाचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याने या सर्वच कलाकारांनी मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक “मंदार देवस्थळी” यांच्यावर हे आरोप केले आहेत.

मंदार देवस्थळी यांनी बोक्या सातबंडे, होणार सून मी ह्या घरची, अभाळमाया, वसुधा, फुलपाखरू, वादळवाट सारख्या अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. आपल्यावर झालेल्या या सगळ्या आरोपांना मंदार देवस्थळी यांनी नुकतेच उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात की, “मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांच payment थकलं आहे तुमचं म्हणणं योग्यच आहे. तुम्ही तुमच्याजागी बरोबरच आहेत, पण मी सुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीतून जात आहे, मला खूप loss झाला आहे, त्यामुळे आत्ता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन अगदी टॅक्स सकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे. कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही तशी माझी इच्छाही नाही ,पण आत्ता माझ्यावर सुध्दा आर्थिक संकट कोसळलय, मी खरंच वाईट माणूस नाही माझी परिस्थिती वाईट आहे मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आत्तापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो.”