

पतीच्या निधनानंतर अभिनेत्री मयुरी देशमुख इमली या स्टार प्लस वरील मालिकेमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकली. आपली सगळी दुःख विसरून पुन्हा एकदा ती जोमाने काम करण्यास सज्ज झाली. परंतु डॉ शीतल आमटे यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे मयुरी पुन्हा एकदा भावुक झाली या भावनेतून तिने चाहत्यांना आवाहन करत एक व्हिडिओ शेअर केला त्यात ती म्हणते… डॉ शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वीच माझ्याशी ओळख नसतानाही फोनवरून संवाद साधला. मी तुझ्यापाठीमागे खंबीरपणे उभी आहे असे म्हणत त्यावेळी तिने दिलेला धीर , ताकद तिचा हा मोठेपणा मला खूप भारावून गेला होता. तिचे हे अचानक जाणे माझं वैयक्तिक नुकसान करून गेला आहे याचा तितकाच त्रासही मला होत आहे.

समाजात काही समजुती निश्चित केल्या गेल्या आहेत जसे की पुरुष मंडळी खूप स्ट्रॉंग असतात किंवा एखादा नेता किंवा मोठी व्यक्ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे , त्यांनी रडलं नाही पाहिजे, सगळी संकटं एकट्यानेच पेलवली पाहिजेत, स्ट्रॉंग बनण्याच्या या सर्व जबाबदाऱ्या अशा पुरुष मंडळींनीच सांभाळल्या पाहिजे अशी कुठेतरी बुरसटलेली विचारसरणी आपल्या मनात बिंबवलेली पाहायला मिळते सध्याच्या वातावरणात हे बदलणं खूप खूप गरजेचं आहे. मला ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांचे मेसेजेस येतात की ताई तू खूप धीराची आहेस..स्ट्रॉंग आहेस, पण मी विचार करायचे की ही लोकं मला का स्ट्रॉंग बोलताहेत? मी तर रोज रडतीये. मला तर रोज त्रास होतोय…मी बऱ्याचदा त्याच त्याच गोष्टी माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करत असते. मग मी स्ट्रॉंग कशी?…पण नंतर माझ्या लक्षात आलं की हेच स्ट्रॉंग बनणं असावं…आपल्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करणं हेच तुम्हाला धीर देतं अस मला वाटतं. तुमच्या आयुष्यात देखील असा एखादा व्यक्ती असावा ज्याच्यासोबत तुम्ही तुमच मन मोकळं करू शकाल. न घाबरता न डगमगता अगदी बिनधास्तपणे तुम्ही एखाद्याला मदत मागू शकता अशी एक तरी व्यक्ती तुमच्याजवळ असावी ज्याला तुम्ही तुमच्या अडचणी, खाजगी गोष्टी सांगून मन मोकळं केलं पाहिजे. अशी व्यक्ती नसेल तर तुमच्यासाठी हेल्पलाईन्स आहेत, सायको थेरपिस्ट आहेत, कौन्सिलरस आहेत जे तुम्हाला अगदी परवडतील अशा दरामध्ये योग्य ती दिशा दाखवू शकतात. तुम्हाला आता कोणाला असं मनमोकळेपणानं बोलावसं वाटत असेल, आपला त्रास दुसर्यांना सांगावासा वाटत असेल तर आताच फोन लावून बोला…अर्थात हा सर्व माझा विचार आहे मला माहित नाही यातून किती फरक पडेल ,मला हे बोलावसं वाटलं म्हणून मी हे तुमच्यासोबत बोललीये…”