
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत श्रेयसची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजेच अभिनेता सचिन देशपांडे याने आज २४ जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर करत बाप झालो असल्याचे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. याबाबत त्याने एक सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे त्यात तो म्हणतो… 24 dec 2020, गुरुवार ची सकाळ आम्ही सगळेच उत्साह आणि काळजी हे भाव एकत्र चेहेऱ्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. काय होईल ह्याचा उत्साह होता तर सगळ नीट होईल ना ह्याची काळजी होती. तसं बघितलं तर पियुषा आणि माझ्या बाबतीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या गुरुवारी च घडल्या आहेत. मग आमचा साखरपुडा असो, आमचं लग्न असो सगळं गुरुवारीच..

पण हा गुरुवार जरा खास होता, खासच होता कारण ह्या गुरुवारी आमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडणार होती, आम्हाला पूर्ण करणारी व्यक्ती आयुष्यात येणार होती. जवळपास अर्धा तास उलटून गेला होता पियुषा ला ऑपरेशन रूम मध्ये नेऊन, आणि माझे पेशन्स संपायला लागले होते. कधी कळणार कधी कळणार असं सारखं मनात व्हायला लागलं होतं आणि तेव्हढ्यात क्यां क्यां असा रडण्याचा आवाज ऑपरेशन रूम मधून आला, काय झालंय मुलगा की मुलगी? हे ऐकण्याच्या आधीच मी रडण्याचा आवाज ऐकून उड्या मारायला लागलो होतो. मी उड्या मारत असतानाच डॉक्टर आले आणि म्हणाले अभिनंदन “मुलगी झाली”, मी सांगूच शकत नाही की हे ऐकून मनात नक्की काय झालं होतं. पराकोटीचा आनंद काय असतो हे कदाचित शब्दात मांडता येत नसावं ते नुसतच अनुभवावं. आणि तो अनुभव मी त्या क्षणी घेत होतो. डॉक्टरांनी बाळाला आमच्या कडे दिलं आणि नकळत डोळ्यांत पाणी आलं. चेहेऱ्यावर खूप हसू, नुसतं उड्या मारणं आणि मनातून खुप भरून येणं असं सगळंच एकत्र मी करत होतो. हळू हळू जरा शांत झालो आणि मग बाळाला हातात घेतलं. सचिन ते सचिन बाबा असा एक प्रवास पूर्ण झाला होता. बाप माणूस झालो होतो.. पण पियुषा अजून आत होती, cesarean झाल्यामुळे तिला वेळ लागणार होता. आणि तिला thank you म्हणण्यासाठी मी आतुर झालो होतो. मग जवळ पास एका तासाने पियुषा ला आत आणलं, खरंतर तिला घट्ट मिठी मारायची होती पण cesarean झाल्यामुळे ते शक्य नव्हत. जितका वेळ शक्य होईल तेवढं तिला thank you म्हणालो. दोघे ही खुप रडलो त्यादिवशी आणि त्या दिवसापासून आज पर्यंत almost रोज तीला thank you म्हणातोय. आमच्या बाळाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे, आज तीचा तसा एक महिन्याचा वाढदिवस आहे.. मला आयुष्यभर पुरेल असा आनंद दिल्याबद्दल पियुषा तुला खूप खुप thank you आणि आमच्या बाळाला पहिल्या महिन्याचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. मुलगी झाली हो