नवीन वर्षाची चाहूल लागली तशी मराठी सृष्टीत लगीनघाई देखील पाहायला मिळाली. अभिज्ञा भावे, मानसी नाईक, मिताली मयेकर या अभिनेत्री नव्या वर्षात विवाहबद्ध झाल्या. या चर्चेत असलेल्या अभिनेत्रिंबरोबरच आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई सध्या जोरदार सुरू असलेली पाहायला मिळत होती. आज रविवारी १४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन डेचे औचित्य साधून अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता आस्ताद काळे विवाहबद्ध झाले आहेत. पुण्यातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे दोघेही अगदी साध्या पद्धतीने म्हणजेच नोंदणी पद्धतीने लग्न बंधनात अडकले आहेत.

सकाळी ११.३० च्या मुहूर्तावर आस्ताद आणि स्वप्नाली यांचा हा लग्नसोहळा पार पडला असून लग्नात स्वप्नालीने मरून रंगाची भरजरी साडी नेसली होती तर आस्तादने तिला साजेसा असा पेहराव केलेला पाहायला मिळाला. लग्न साध्या पद्धतीने केले असले तरी या लग्नात नातेवाईक आणि मित्रमंडळी तसेच जवळच्या सहकालाकारांनी हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नाली आणि आस्ताद यांचे त्यांच्या सहकलाकारांनी केलेले केळवण चर्चेत आले होते. त्यावेळी आम्ही कोर्टात जाऊन लग्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घरी लग्नाची लगबग पाहायला मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मेहेंदीचा सोहळा पार पडला होता या सोहळ्यात स्वप्नालीची खास मैत्रीण आणि अभिनेत्री शाल्मली तोळ्ये हिने हजेरी लावली होती. मेहेंदी सोहळ्या अगोदर आस्ताद आणि स्वप्नालीचे राजेशाही पेहरावात प्रिवेडिंग फोटोशूट करण्यात आले होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. लग्नबांधनात अडकलेल्या या नवदाम्पत्यांस त्यांच्या आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…