नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सृष्टीतील तब्बल ३ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबांधनात अडकणार आहेत. २०२० या सरत्या वर्षात या अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. या तीनही अभिनेत्री नेमक्या कोण आहेत ते पाहुयात… गेल्याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत एंगेजमेंट केली होती. त्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही दोघे लग्न करणार आहोत असे तिने सोशल मिडियावरून सांगितले होते. नुकतीच मानसीने आपल्या खास मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी साजरी केली आहे. या पार्टीत अभिनेत्री दीपाली भोसले- सय्यद हिनेही हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

#manukishadi #parukidulhan हे हॅशटॅग वापरून मानसी आपल्या लगीनघाईची लगबग चाहत्यांसोबत शेअर करत आहे. मानसी नाईक हिच्याप्रमाणे मराठी सृष्टीतील आणखी दोन अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. त्यापैकी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी नुकतीच हळद फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे अभिज्ञा आणि मेहुल पै लवकरच लग्नबांधनात अडकणार आहेत. शिवाय त्या दोघांनाही मराठी सृष्टीतील काही कलाकारांनी केळवणाला देखील आमंत्रित केले होते. मुख्य म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी देखील अभिज्ञा आणि मेहुलचे केळवण केलेले पाहायला मिळाले. यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू आहे. २०१९ साली जानेवारी महिन्यातच सिद्धार्थ आणि मिताली यांनी एंगेजमेंट केली होती त्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याचीही चर्चा बऱ्याचदा पाहायला मिळाली. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हे दोघेही २०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मिताली आणि सिद्धार्थ यांचेही केळवण वेगवेगळ्या सिब्रिटींच्या घरी झालेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे यासर्वांच्या लगीनघाईची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.