हिंदी बिग बॉसच्या भरघोस यशानंतर कलर्स मराठी वाहिनीने आपल्या मराठी रसिकांसाठी बिग बॉस मराठी हा रिऍलिटी शो सुरू केला. आजवर या शोचे दोन सिजन पार पडले असून प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसला. आता लवकरच बिग बॉसचा तिसरा सिजन येणार असून त्यात कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत याची यादी समोर येत आहे. मागील वर्षी हा शो नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल अशी आशा व्यक्त केली गेली होती परंतु आरोग्याच्या कारणास्तव एक खबरदारी म्हणून हा शो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर २०२१ साली हा शो सुरू होईल असे सूचित केले होते.

बिग बॉस मराठी च्या लवकरच येऊ घातलेल्या ३ऱ्या सीजनमध्ये अनेक मोठे कलाकार सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये काहें दिया परदेस मालिका फेम “ऋषी सक्सेना”च्या नावाची जोरदार चर्चा आहे. या मालिकेच्या यशानंतर ऋषी सक्सेनाने gud boy(वेबसिरीज) फत्तेशीकस्त, लाजीरा, इश्काची नौका, रुहाणी सारख्या म्युजिक व्हिडीओ आणि चित्रपटातून काम करून मराठी सृष्टीत तग धरून ठेवला एवढेच नाही तर मराठी टीव्ही क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय पुरुषांच्या यादीत प्रथम स्थानही त्याने पटकावले होते. का रे दुरावा मालिकेतील रजनी अर्थात अभिनेत्री “नेहा जोशी” बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिजन मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. रिअल लाईफमध्ये बिनधास्त असलेली नेहा या शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल. झेंडा, नशीबवान, ड्रीम मॉल, लालबागची राणी , न्यूड, उकळी सारख्या अनेक दमदार चित्रपटातून तिच्या विविधांगी भूमिकांचे नेहमीच कौतुक झाले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून “समीर चौगुलेने” प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अशा शोमधून विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून तो प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार .

माझिया माहेरा मालिका फेम अभिनेत्री “नक्षत्रा मेढेकर” ही देखील मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा भाग असणार असे बोलले जात आहे. कॉलेजमध्ये असतानाच नक्षत्राला माझिया माहेरा मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेमुळे नक्षत्राला चांगली लोकप्रियता मिळाली होती. गोळाबेरीज, व्यक्ती आणि वल्ली, फु बाई फु, ये रे ये रे पैसा अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातून “आनंद इंगळे” या कलाकाराने आपल्या अभिनयाचा पाया घट्ट रोवला आहे. गंभीर भूमिका असो वा विनोदी अशा सर्वच भूमिका त्यांनी तितक्याच नेटाने सांभाळल्या आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आनंद इंगळे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.