नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेही बुधवारी ६ जानेवारी रोजी मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या पाठोपाठ आता मराठी सृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई पाहायला मिळते आहे. आज ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता “आशुतोष कुलकर्णी” विवाहबंधनात अडकला आहे. आशुतोषने लेक माझी लाडकी, असंभव,साथ दे तू मला, गंध फुलांचा गेला सांगून , चेकमेट अशा विविध मालिका तसेच चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

आज ८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यामध्ये आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला धनश्री काडगावकर हिच्यासह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आशुतोषची पत्नी देखील अभिनेत्री असून तिने ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘असे हे कन्यादान’ या मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. रुचिकाने इंजिनिअरिंग करत असताना २०१४ साली श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत ती सेकंड रनरअप ठरली. या यशानंतर मालिकेतून तिला अभिनयाची उत्तम संधी मिळाली. अभिनयाव्यतिरिक्त रुचिकाला क्राफ्टिंग आणि पेंटिंगची विशेष आवड आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने सोशिअल मीडियावर यांच्या लग्नाची बातमी दिली आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तुर्तास आशुतोष आणि रुचिकाला त्यांच्या आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…