
डिसेंबर महिन्यात अभिनेता शशांक केतकरने पत्नी प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यात प्रियांका प्रेग्नन्ट असल्याचे त्याने चाहत्यांना कळवले होते. त्याच्या या सुखद बातमीला अनेक कलाकार मंडळींनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यावर आज शशांकने आपल्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली असल्याचे सांगत बाळासोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. “ऋग्वेद शशांक केतकर” असे कॅप्शन देऊन बाळाचे नाव त्याने या फोटोसोबत जाहीर केले आहे.

या आनंदाच्या बातमीसोबतच शशांकचा आनंद यावेळी द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे त्याला कारणही अगदी तसेच आहे. लवकरच शशांकची धाकटी बहीण “दीक्षा केतकर” ही सोनी मराठी वाहिनीवरील ” तू सौभाग्यवती हो” या नव्या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारणार आहे. मालिकेतून अभिनयाला पुरेसा वाव मिळत असल्याने दीक्षाच्या करिअरसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. या मालिकेतून दीक्षा ऐश्वर्याची भूमिका साकारणार असून हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर यांच्याही यात महत्वाच्या भूमिका असणार आहेत. दीक्षा सोबत शशांक देखील झी मराठीवर सुरू होत असलेल्या “पाहिले न मी तुला” या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेनंतर शशांक पुन्हा झी वाहिनीची मालिका साकारणार आहे. त्यामुळे भावा बहिणीच्या हातात नवी मालिका यासोबतच बाप झाल्याचा आनंद यासर्वांमुळे नव्या वर्षाची ही सुरुवात त्याच्यासाठी खूपच खास ठरलेली पाहायला मिळत आहे. दीक्षाला नव्या मालिकनिमित्त तसेच प्रियांका आणि शशांकला पुत्ररत्न प्राप्तीनिमित्त त्यांचे मनापासून अभिनंदन…