झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शशांक केतकर प्रथमच या मालिकेतून विरोधी भूमिका दर्शवत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. तर अभिनेता आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री तन्वी मुंडले या कलाकारांनी या मालिकेतून प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. आज तन्वीच्या बहिणीची अर्थात मेघाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात…

मालिकेत मेघाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “प्रियांका तेंडोलकर” हिने. पाहिले न मी तुला या झी वाहिनीच्या मालिकेअगोदर प्रियांकाने जय मल्हार मालिकेतूनही काम केले होते. प्रियांकाचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. पार्ले टिळक विद्यालयातून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर तिने कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. ललित कला केंद्रमधून तिने अभिनयाचे धडेही गिरवले. जय मल्हार या मालिकेनंतर प्रियांका ने झी युवा वरील फुलपाखरू मालिकेत भूमिका साकारली होती या भूमिकेनंतर तिला साथ दे तू मला मालिकेत प्रमुख नायिका साकारण्याची नामी संधी मिळाली. परंतु काही कारणास्तव प्रियांकाने ही मालिका अर्ध्यावर सोडलेली पाहायला मिळाली होती. परंतु काही काळानंतर मालिकेतून मला तडकाफडकी काढण्यात आलं असल्याचा आरोप त्यावेळी तिने मालिकेच्या टीमवर लावला होता. मालिकेतून असं अचानकपणे रिप्लेस केल्याने माझीच नाही तर प्रेक्षकांचीही फसवणूक केली असल्याचे तिने आपल्या भूमिकेतून स्पष्ट केले होते. या मालिकेनंतर प्रियांका काही काळ कोणत्याही मालिकेत दिसली नाही. परंतु झी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा तिला झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. पाहिले न मी तुला मालिकेतून ती प्रमुख नायिकेच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी प्रियांका तेंडोलकर हीला खूप खूप शुभेच्छा…