मराठी सृष्टीतील नटसम्राट म्हणून डॉ श्रीराम लागू सर्वपरिचित आहेत. १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे डॉ बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू यांच्या पोटी डॉ श्रीराम लागू यांनी जन्म घेतला.बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी नाटकांत काम केले. डॉ श्रीराम लागू हे मूळचे कान, नाक, घसा शल्यविशारद परंतु आपला व्यवसाय सोडून ते अभिनयाकडे वळले इथे चित्रपटांपेक्षाही ते नाटकांत जास्त रमलेले पाहायला मिळाले. १०० हुन अधिक हिंदी मराठी चित्रपट, ४० हुन अधिक हिंदी, मराठी, गुजराथी नाटके त्यांनी साकारली. सिंहासन, पिंजरा, झाकोळ या चित्रपटांसोबत हिमालयाची सावली, नटसम्राट, वेड्याचे घर उन्हात, सूर्य पाहिलेला माणूस, गिधाडे ही त्यांची गाजलेली नाटके आपल्या अभिनयाने चांगलीच रंगवली.

डॉ श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यादेखील रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. त्यांना “तन्वीर” नावाचा मुलगा देखील होता. ९ डिसेंबर १९७१ साली तन्वीरचा जन्म झाला. परंतु वयाच्या २३ व्या वर्षीच त्याचे एका अपघातात निधन झाले. १९९४ साली तन्वीर पुणे मुंबई मार्गे ट्रेनने प्रवास करत होता. खिडकी शेजारील सीटवर बसून तो पुस्तक वाचत असताना खिडकीबाहेरून कोणीतरी फेकलेला दगड थेट त्याच्या डोक्याला लागला. त्यामुळे जोरदार आघात होऊन तन्वीर कोमामध्ये गेला आणि एका आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. ह्या धक्क्यातून डॉ श्रीराम लागू आणि दीपा लागू स्वतःला सावरू शकले नाहीत त्यावेळी संपूर्ण मराठी सृष्टीत शोककळा पसरली हे असं काही घडू शकेल ह्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्याच्या जन्मदिनी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी “तन्वीर सन्मान” नावाने नाट्यकर्मी पुरस्कार आयोजित केले जातात. यातून भारतभरातील रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे पुरस्कृत केले जाते. कोणी उनाड मुलांनी रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावून एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते हे मुळात त्यांच्या लक्षात कसे येऊ शकत नाही याचीच मोठी शोकांतिका वाटते. या कृत्याने आपण कोणाचा जीव तर घेत नाही ना याची अशा भरकटलेल्या तरुणांना जाण होणे आवश्यक आहे.त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना समजवणे आणि दुर्घटनेची जाणीव करून देणे खूपच गरजेचे आहे. अशा माथेफिरुंना याची जाण व्हावी म्हणूनच हा लेख लिहिला जात आहे.