मागील बऱ्याच दिवसांपासून मराठी कलाकारांना इन्स्टाग्राम अकाऊंट वापरण्यावरील निर्बंधांमुळे किंवा ते हॅक केल्याच्या कारणास्तव नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी अर्थात अभिनेत्री अमृता धोंगडे हिचे देखील इन्स्टाग्राम अकाउंट काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने हॅक केले होते. त्यानंतर स्वप्नील जोशीला देखील अशाच नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. आता हीच परिस्थिती अभिनेता भरत जाधव सोबतही घडलेली पाहायला मिळत आहे परंतु याचे कारण थोडे वेगळे असल्याकारणाने शेवटी “अशा परिस्थितीत काय करावं गलगले…!!!” म्हणत भरत जाधवने मिश्किल प्रश्न विचारून नेहमीप्रमाणेच चाहत्यांना हसवण्याचा प्रयत्न केला भरत जाधव आपल्या पोस्टमध्ये नेमका काय म्हणतो ते पाहुयात…

दोन दिवसांपूर्वी एक मेसेज आला की तुमची account verification ची रिक्वेस्ट प्रोसेस मध्ये आहे पुढील लिंकवर जाऊन तुमचा लॉगिन ID,पासवर्ड आणि मोबाईल नंबर सबमिट करा. मी ते केलं. काल रात्री परत एका वेगळ्या अकाऊंट वरून एक मेसेज आला की तुम्ही Instagram च्या कॉपी राईट कायद्याचा भंग केला आहे, तुमच्या अकाऊंट बद्दल बऱ्याच तक्रारी आल्या आहेत त्यामुळे पुढील 48 तासात तुमचं अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यात येइल. मी रिप्लाय दिला की माझे फोटो मी स्वतः पोस्ट करतोय यात कॉपी राईट चा संबंध येतो कुठे..? तर त्यांचं म्हणणं असं होत की तुमच अकाऊंट तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर पुढील लिंकवर जाऊन तुमचा लॉगिन ID,पासवर्ड आणि मोबाईल नंबर सबमिट करा. बर मीही जास्त विचार न करता तो सबमिट केला. तर त्यांचा रिप्लाय आला की तुम्ही दिलेली माहिती चुकीची आहे. गंमत अशी झालीय की मी अकाऊंट काढल होत २०१३ ला त्यानंतर मी फारस कधी लॉगिन- लॉग आऊट केलं नाही. त्यामुळे माझा पासवर्ड आता मलाच लक्षात नाही. ईमेल आयडी ची पण तीच अवस्था. बर जो मोबाईल नंबर ह्या अकाऊंट ला रजिस्टर केलाय तो बरीच वर्ष झाली मी वापरत नाही. तो आता भलत्याच माणसाच्या नावे आहे. बर तो जो कोणी इसम माझं अकाऊंट 48 तासात बंद करणार आहे तो आता म्हणतोय आधी पासवर्ड रिसेट करा… आणि पुन्हा सगळे डिटेल्स मला द्या नाहीतर तुमचं अकाऊंट १००% बंद करेन. अशा परिस्थितीत काय करावं गलगले..!!!