झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील टोण्या, डिंपल, सरू आज्जी, बज्या, नाम्या ही सर्वच पात्र आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मालिकेला एक ठराविक कथानक असल्याने कुठल्याही प्रकारे ती भरकटत गेलेली दिसून येत नाही हीच या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. देवमाणूस (वेगळ्या अर्थाने) असलेला मालिकेतील हा डॉक्टर अजून किती जणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवण्याचे काम करतो याची उत्कंठा दिवसागणिक वाढत जाताना दिसते. डॉक्टरच्या वागणुकीला कंटाळून नुकतेच या मालिकेतील अपर्णाच्या पात्राने आपले आयुष्य संपवले आहे.

त्यामुळे मालिकेत आता वेगळे वळण आलेले पाहायला मिळते लवकरच या मालिकेत आता आणखी एक नवीन पात्र दाखल होताना दिसत आहे. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… मालिकेत नव्याने दाखल होणारे पात्र साकारले आहे अभिनेत्री “प्रतीक्षा जाधव” हिने. मराठी नाटक , मालिका, चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रतीक्षा जाधव झळकली आहे. मूळची पुण्याची असलेल्या प्रतिक्षाने कॉलेजमध्ये असताना नाटकांतून काम केले आहे. छोटी मालकीण, मोलकरीणबाई, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिका तसेच चला खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, भुताचा हनिमून, सौभाग्य माझं दैवत, खेळ आयुष्याचा हे मराठी चित्रपट तीने साकारले आहेत. दिल ढुंडता है, क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसोबतच एका दाक्षिणात्य चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग बनली आहे. अभिनयासोबतच प्रतीक्षाला नृत्याची देखील विशेष आवड आहे. देवमाणूस मालिकेतून प्रतीक्षा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या येण्याने मालिकेला निश्चितच एक वेगळे वळण लागणार आहे. प्रतीक्षाला या नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा…