
देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग त्यात सरू आज्जीच्या म्हणी असोत किंवा टोण्या आणि डिंपल या दोन्ही बहीण भावंडामधील कॉमेडी, त्यात भरीस भर म्हणजे नाम्या आणि बज्याची जुळून आलेली केमिस्ट्री या सर्वांमुळे मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडते. मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकत आहे तशी याची उत्कंठा वाढताना दिसते. मालिकेत सुरुवातीपासूनच “विठ्ठल” चे एक कधीही न बोलणारे पात्र दाखवले आहे. विशेष म्हणजे हे पात्र मालिकेत शुभ अशुभाचे संकेत दर्शवण्याचे कार्य करत असते.

आज विठ्ठलचे पात्र साकारणाऱ्या बाल्कलकाराबद्दल जाणून घेऊयात… या मालिकेतला विठ्ठल कधीही बोलत नसला तरी त्याचा निरागस चेहरा आणि त्यावरील हावभाव पाहून कुतूहल वाटते. ही भूमिका साकारली आहे “वंश शाह” या बालकलाकाराने. वंश शाह शालेय शिक्षणात हुशार तर आहेच शिवाय डान्सची देखील त्याला विशेष आवड आहे. आपल्या वडिलांनाच तो आपल्या आयुष्यातील खरा रोल मॉडेल मानतो . त्यांच्याच प्रेरणेने अभिनयाची आवड त्याच्यात निर्माण झाली. अगदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर कधी बाल लीलया करणारा कृष्णही त्याने साकारला आहे. नृत्य, अभिनय आणि मॉडेलिंग अशा विविध क्षेत्रात वंश सहज वावरताना दिसतो. देवमाणूस ही त्याची अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका असली तरी पुढे जाऊन तो या क्षेत्रात भरीव कामगिरी करेल अशी आशा आहे. वंशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…