देवमाणूस मालिकेतील “मायरा” बद्दल जाणून आश्चर्य चकित व्हाल…अवघ्या ५ वर्षाची ही चिमुरडी आहे खूपच खास

झी मराठीवरील “देवमाणूस” ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत डॉ अजितकुमारने केलेल्या कट कारस्थानांचा सुगावा एसीपी दिव्या सिंग घेत असल्याने या तपासाला आता लवकरच वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेच्या जागी आता “रात्रीस खेळ चाले ३” ही नवी मालिका सुरु केली जात आहे त्यामुळे देवमाणूस मालिका आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात दिव्या सिंग आणि तिची मुलगी मायरा या दोन नव्या पात्रांना अभिनयाची संधी मिळाली आहे. दिव्या सिंगची भूमिका नेहा खान साकारत आहे तर मालिकेतील मायराचे पात्र साकारणाऱ्या चिमुरडीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत….

देवमाणूस मालिकेत चिमुरड्या मायराचे पात्र साकारले आहे बालकलाकार ” अर्नवी खडसे” हिने. ३ ऑगस्ट २०१५ रोजी अर्नवीचा जन्म झाला. अर्नवीचे वडील योगेश खडसे हे मूळचे अमरावतीचे परंतु कामानिमित्त सध्या ते आपल्या कुटुंबासोबत पुण्यातच वास्तव्यास आहेत. अर्नवी ‘मिमी खडसे’ या नावानेही ओळखली जाते. तुम्हाला जाणून कौतुक वाटेल की अर्नवी अनेक नामवंत ब्रँडसाठी एक चाईल्ड मॉडेल म्हणून काम करत आहे. एवढेच नाही तर यातून तिने अनेक बक्षीसंही आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. अर्नवी आणि तिची मोठी बहीण “चारवी” या दोघीही अनेक ब्रॅण्डसाठी मॉडेल म्हणून रॅम्पवॉक करताना दिसतात. जेनेलिया, रितेश देशमुख, दलजीत दोसांझ, अमेय वाघ अशा काही कलाकारांसोबत अर्नवीने जाहिरात, अल्बम तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून बालकलाकार म्हणून काम केले आहे. टाइम्स फॅशन विक, लॅकमे फॅशन विक सारख्या मोठमोठ्या ब्रँडच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक त्याचप्रमाणे जवळपास २२ हुन अधिक शोचे विजेतेपद तिने पटकावले आहेत. Westside, Disney, fbb, First Cry, O’girl, Rose Couture, Doll, kerry kids अशा जवळपास ३२ नामवंत फॅशन ब्रॅण्डसाठी अर्नवी एक मॉडेल म्हणून काम करत आहे. एवढ्या कमी वयात फॅशनच्या दुनियेत तिने मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल. देवमाणूस मालिकेत तिला प्रथमच छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे . तिला मिळालेली ही संधी आणखी उंच भरारी घेण्यास निश्चितच कामी येईल हे वेगळे सांगायला नको… अभिनय आणि फॅशन दुनियेत अर्नवीला यापुढेही अमाप यश मिळो हीच एक सदिच्छा…