देवमाणूस मालिकेतील टोण्या आणि डिंपलची आई अर्थात मंगलताईंची भूमिका विशेष लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. मालिकेत अगदी साध्या सरळ दिसणाऱ्या मंगलताईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अंजली जोगळेकर” यांनी. मालिकेत अंजली जोगळेकर यांनी परिस्थितीमुळे हतबल झालेल्या मंगल ताईंची भूमिका अतिशय सुरेख साकारली आहे त्यांच्या या सहजसुंदर अभिनयाचे कौतुक करावे तेवढे कमीच. खऱ्या आयुष्यात देखील त्या तितक्याच शांत स्वभावाच्या असल्या तरी स्टायलिश जीवन जगणे त्यांना खूप आवडते असे म्हणायला हरकत नाही.

सेटवर इतर कलाकारांसोबत मजा मस्ती करणे, त्यांच्यासोबत एखाद्या गाण्यावर थिरकणे त्यांनी अनुभवले आहे. देवमाणूस मालिकेअगोदर अंजली जोगळेकर यांनी अनेक मालिका, चित्रपट तसेच लघुचित्रपटाच्या माध्यमातून अभिनय साकारला आहे. त्यासाठी उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसं देखील त्यांनी मिळवली आहेत. या वर्षी पार पडलेल्या सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये “सिलवट ” या लघुचित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासोबतच उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अंजली जोगळेकर यांना पुरस्कार मिळाला आहे. डीबीएस बँकेच्या व्यावसायिक जाहिरातीत सचिन तेंडुलकरसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. सावित्री, त्रिज्या, फिंगरप्रिंट हे लघुपट आणि मोलकरीण बाई, मिसेस मुख्यमंत्री, भीमराव या गाजलेल्या मालिकाही त्यांनी अभिनित केल्या आहेत. 66 सदाशिव, खिचिक अशा काही मोजक्या चित्रपटातून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या आहेत. झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस मालिकेतील त्यांनी साकारलेली मंगलताई खूपच भावल्याने त्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या. अंजली जोगळेकर यांना त्यांच्या भूमिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा….