तुम्ही हिला ओळखलंत का? सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीची सख्खी बहीण देखील आहे अभिनेत्री

निशिगंधा वाड आणि दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेला “अशी ज्ञानेश्वरी”(प्रमाणपत्र१९९८) हा मराठी चित्रपट त्याकाळी फारच लोकप्रिय झाला होता. या प्रमुख नायक आणि नायिके खेरीज कुलदीप पवार, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव यांच्या देखील यात महत्वाच्या भूमिका होत्या या कलाकारांनी चित्रपटात विरोधी भूमिका दर्शवली असली तरी चिमुरड्या ज्ञानेश्वरीमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलते हे या चित्रपटात दर्शवले गेले होते. चित्रपटात बालभूमिकेत दिसलेली ही चिमुरडी ज्ञानेश्वरी आता काय करते किंवा ती सध्या कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होतो त्याबाबत आज अधिक जाणून घेऊयात…

ज्ञानेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे “अक्षता नाईक”. अशी ज्ञानेश्वरी या चित्रपटाचे निर्माते अरविंद नाईक यांची ती कन्या होय. अक्षता प्रॉडक्शन्स या त्यांच्या निर्मिती संस्थेतूनच अशी ज्ञानेश्वरी चित्रपट बनवण्यात आला होता. अक्षता आणि अक्षया या त्यांच्या दोन कन्या होय. या चित्रपटानंतर अक्षता फारशी कुठल्या चित्रपटात दिसली नसली तरी तिची धाकटी बहीण अक्षया नाईक कलर्स मराठीवरील “सुंदरा मनामध्ये भरली” या लोकप्रिय मालिकेतून लतीकाच्या प्रमुख भूमिकेत झळकताना दिसत आहे. अक्षयाला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्सची आवड होती अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी ये रिश्ते है प्यार के, ये रिशता क्या कहलाता है यांसारख्या हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. मराठी मधील ही तिची पहिलीच मालिका आहे. याशिवाय अक्षयाने फिट इंडिया या चित्रपटात देखील काम केले आहे. अक्षतापेक्षा तिची धाकटी बहीण अक्षयाने अभिनय क्षेत्रात आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. अक्षताचे आता लग्न झाले असून सध्या ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईतच स्थायिक आहे. अक्षयाप्रमाणेच अक्षताला देखील डान्सची विशेष आवड आहे. या दोघींचे डान्सचे व्हिडीओ अक्षया सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसते. तब्बल २२ वर्षानंतर दिसलेली ही अक्षता बहुतेकांनी ओळखली असावी. अक्षताने अभिनयातून काढता पाय घेतला असला तरी मराठी चित्रपटातली बालकलाकार म्हणून ती कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. या दोघी कलाकार बहिणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…