निवेदिता जोशी ह्या ९० च्या दशकातील एक उत्तम मराठी अभिनेत्री, आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे निवेदिता जोशी ह्यांचे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ ह्यांच्याशी प्रेम विवाह झाला. त्यानंतर मुलाचे पालनपोषण नीट व्हावे म्हणून त्यांनी अभिनयातून काढता पाया घेतला. झी मराठीच्या अग्गबाई सासूबाई ह्या मालिकेतून त्यांनी बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्याच्या सोज्वळ अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांनी त्यांना आपलेसे केले. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि निवेदिता ह्यांचे वडील, आई तसेच बहीण देखील अभिनेत्री आहेत. चला तर जाणून घेऊयात निवेदिता जोशी ह्यांच्या परिवाराबद्दल काही खास गोष्टी….

निवेदिता जोशी लहानपणापासूनच नाटकांतून आणि चित्रपटातून काम करत असत. निवेदिता जोशी यांचे वडील गजन जोशी आणि आई विमल जोशी यांच्याकडून त्यांना अभिनयाचे धडे मिळाले आहेत. गजन जोशी यांनी ७० च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्य कांक्षीनि अशा चित्रपटातून अभिनय साकारला आहे. तर त्यांची आई विमल जोशी या आकाशवाणीवरील कामगार सभा, वनिता मंडळ या लोकप्रिय कार्यक्रमांचे सादरीकरण करत असत. त्यांचे स्वच्छ शब्दोच्चार आणि अस्सल मराठी बोलणे तितकेच भाव खाऊन जात असत त्यामुळे त्या खूपच लोकप्रिय देखील झाल्या होत्या. त्यांनी बलराज सहानी, संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकांतून काम केले होते. चाकरमानी या मराठी नाटकातून मच्छिन्द्र कांबळी यांच्या आईची भूमिका साकारली होती. खरं तर जोशी कुटुंबातील सर्वच सदस्यांना वाचनाची भयंकर आवड. हेच गुण त्यांच्या दोन्ही मुली निवेदिता आणि मीनल यांनी हेरलेले पाहायला मिळतात. आजही डॉ मीनल परांजपे यांच्याकडे साड्यांऐवजी पुस्तकाचाच खजिना जास्त आहे याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. आज याबद्दल अधिक जाणून घेऊयात… निवेदिता जोशी ह्यांचे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ ह्यांच्याशी प्रेम विवाह झाला त्यावेळी त्यांची थोरली बहीण डॉ मीनल परांजपे यांनीच पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला होता.

डॉ मीनल परांजपे या देखील मराठी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी अभिनय साकारला आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. “अरण्यक” या गाजलेल्या नाटकातून मीनल परांजपे यांनी ‘कुंतीची’ भूमिका साकारली होती. २०१९ सालच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००१ सालच्या अमोल पालेकर दिग्दर्शित “ध्यासपर्व” या चित्रपटातून त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. योजना प्रतिष्ठान तर्फे ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यात मीनल परांजपे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. डॉ मीनल परांजपे उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र त्या एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व देखील आहेत हे बहुतेकांना माहीत नसावे. कौटिल्याचा अर्थशास्त्र या एका वेगळ्या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे. संस्कृत विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा केला आहे. केम्ब्रिज अभ्यासाच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी त्यांनी पार्ले टिळक विद्यालयाच्या मदतीने विविध स्तरातील विद्यार्थ्यांना गेल्या २० वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. केम्ब्रिज परीक्षा कशा द्याव्यात त्याचा अभ्यास कसा करावा याबाबत ते नेहमीच विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन करत असतात. आज अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा ५६ वा वाढदिवस, वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!!!…