येत्या काही दिवसात कलर्स वाहिनी ‘डान्स दिवाने सिजन 3’ हा रिऍलिटी शो प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. लहाणापासून अगदी मोठ्यांपर्यंत एकाच मंचावर कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी मिळते हीच या शोची खासियत. माधुरी दीक्षित, धर्मेश आणि तुषार कालिया या शोचे जज म्हणून काम सांभाळणार आहेत. तुम्हाला जाणून कौतुक वाटेल या शोमध्ये मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “जीवनकला” यांचे तब्बल ४० वर्षांनी पुनरागमन होणार आहे. नृत्य हा आपला श्वास मानणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला यांच्यासाठी ही बाब खुपच खास ठरली आहे.

आजच्या पिढीला जीवनकला कोण? हे नाव परिचित नसावे त्याबाबत थोडक्यात आढावा घेऊयात…. अभिनय आणि नृत्यामुळे हिंदी मराठी सृष्टीत जीवनकला यांना एक अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख मिळाली आहे. ६० ते ७० च्या दशकातील हिंदी मराठी चित्रपटातील अनेक हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली पाहायला मिळतात. जीवनकला यांच्या आई गंगुबाई आणि वडील दत्तात्रय (दत्तोबा) कांबळे हे पुण्यातील युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट मध्ये कलाकार म्हणून काम करत होते. २९ जून १९४४ रोजी दिवाकर वाड्यात जीवनकला यांचा जन्म झाला. याच वाड्यात मंगेशकर कुटुंब देखील राहत होते. लता दिदींनीच त्यांच्या आईला ‘जीवनकला’ हे नाव सुचवले होते. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांनी बाळासाहेब गोखले यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले होते. घर लक्ष्मीरोडलगतच असल्याने नृत्याचा सराव करताना एक दिवस मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांनी घुंगरांचा आवाज ऐकला आणि घरी येऊन चित्रपटात काम करणार का अशी विचारणा केली. “अखेर जमलं” या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मंगेशकर कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये नृत्य सादर करता आले. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत आले “गुंज उठी शहनाई” या गाजलेल्या हिंदी चित्रपटात ‘अंखीयां भूल गई…’ गाण्यात नृत्य सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही किस्मत पलट के देख, सरस्वतीचंद्र, पारसमणी, पुत्र व्हावा ऐसा, चिमण्यांची शाळा, हा माझा मार्ग एकला, वैशाख वणवा, शेरास सव्वाशेर, मराठा तितुका मेळवावा, काळी बायको अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून सहकलाकार, खलनायिका आणि नृत्यांगना अशा विविध भूमिकेतून त्या चमकल्या.

‘जिथे सागरा धरणी मिळते…’, ‘अखेरचा हा तुला दंडवत…’, ‘हसता हुवा नुरानी चेहरा…’, ‘रेशमाच्या रेघांनी…’ अशी अनेक हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झाली आहेत. १९६९ साली जीवनकला या लेखक राम केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर जीवनकला यांनी अभिनयाला राम राम ठोकला त्यानंतर राम केळकर यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटात यशस्वी लेखक म्हणून भूमिका बजावल्या . योगेश, हेमंत आणि मनीषा ही त्यांची तीन अपत्ये. आज हेमंत एडिटर, रायटर, डायरेक्टर असून सुभाष घई यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे तर त्यांची मुलगी “मनीषा केळकर” मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. मानिषाने भोळा शंकर , बंदूक, झोल, लॉटरी, अशा हिंदी मराठी चित्रपटात अभिनय साकारला आहे. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या जीवनकला यांनी मात्र नृत्याची आपली आवड आजही जपलेली पाहायला मिळते. आज जीवनकला ७७ वर्षांच्या असूनही त्यांचे कथ्थक आणि लोकनृत्याचे क्लासेस असेच अविरत सुरू आहेत. नृत्य आपला श्वास मानणाऱ्या जीवनकला यांना ‘डान्स दिवाने सिजन 3’ या रिऍलिटी शोमधून पुन्हा एकदा आपली नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. या संधीमुळे “माझा हा दुसरा जन्म झाला आहे” अशी एक गोड प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.