झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या “डान्सिंग क्वीन- साईज लार्ज फुल्ल चार्ज ” या रिऍलिटी शोमध्ये ‘स्नेहा देशमुख” हीने आपल्या नृत्याची अदाकारी सादर करून प्रेक्षक आणि परिक्षकांची देखील वाहवा मिळवली आहे. येत्या रविवारी २७ डिसेंबर रोजी या शोचा फिनाले होणार असून जगातली पहिली वजनदार डान्सिंग क्वीन कोण ठरणार हे स्पष्ट होईल. तूर्तास स्नेहा देशमुख बद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… स्नेहा देशमुख ही मराठी मालिका, चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री असून कॉलेजमध्ये असताना नाटकांतून तीने विविध बक्षिसं पटकावली आहेत. स्नेहा मूळची नगरची शाळेत असल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून तिने सहभाग दर्शवला होता.

लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या स्नेहाने दहावी , बारावीच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. स्नेहाच्या आई मंजुषा या भरतनाट्यमचे क्लासेस घेत त्यामुळे नृत्याचे धडे तीने आपल्या आईकडूनच गिरवले होते. बारावी झाल्यावर २००८ साली तीने पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला. इथेच तिच्या अभिनयाला खरा वाव मिळत गेला. सिंहगड करंडक, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक गाजवून अनेक बक्षिसं पटकावली. यावेळी संजयलीला भन्साळी आणि रेमो डीसुजा यांच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक तिला मिळाले होते. इंजिनिअरिंगच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या स्नेहाने पुढे नोकरी न करता अभिनयातच करिअर करायचे ठरवले. ‘आई रिटायर होतेय’ या व्यावसायिक नाटका निमित्त महाराष्ट्रभर दौरे केले. २०१४ साली 9 एक्स झकास वरील ‘लक्स झकास हिरोईन’ शोमधून पहिल्या तिनात स्थान पटकावले. त्याच वर्षी ई टीव्ही वाहिनीवरील “हृदयी प्रीत जागते” या मालिकेत प्रमुख नायिका साकारण्याची संधी तिला मिळाली. अंगद म्हसकर हा अभिनेता या मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका बजावत होता यात स्नेहाने वीणा ची भूमिका साकारली होती. त्यानंतर एलबिडब्लू या चित्रपटातूनही ती मोठ्या पडद्यावर झळकली. मधल्या काळात झुंबा डान्स टीचर म्हणूनही तिने भूमिका बजावली आहे. सध्या झी मराठीवरील डान्सिंग क्वीनच्या फिनालेपर्यंत तिने मजल मारली आहे त्यानिमित्त स्नेहा देशमुख हिला खूप खूप शुभेच्छा…