बहुतेक मराठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यात काही मालिकांनी गुजराथ, गोवा, हैद्राबाद सारख्या ठिकाणांना पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्रात अजूनही काही दिवस सुरक्षेच्या कारणास्तव मालिकांचे चित्रीकरण करण्यास बंदी घातली आहे त्यामुळे हा मोठा निर्णय सर्वच टीव्ही वाहिन्यांनी घेतलेला दिसतो आहे. झी मराठीवरील माझा होशील ना, देवमाणूस, पाहिले न मी तुला, अग्गबाई सुनबाई, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांनी आपले चित्रीकरण करण्यास नुकतीच सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. हैद्राबाद आणि गोव्यासारख्या ठिकाणी जाऊन या मालिका चित्रीकरणात व्यस्त आहेत त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना नवे एपिसोड पाहायला मिळत आहेत. नुकतेच चला हवा येऊ द्या चे कलाकार देखील जयपूरमध्ये दाखल झाले आहेत ही माहिती स्वतः स्नेहल शिदम हिने आजच तिच्या इंस्टाग्रामवरून दिली आहे. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा शो देखील लवकरच प्रेक्षकांसाठी नवे एपिसोड घेऊन येणार आहे.

परंतु या सर्वासोबतच आणखी एक बाब समोर येत आहे आणि ती म्हणजे झी मराठीवरील कारभारी लयभारी , रात्रीस खेळ चाले या मालिकांचे चित्रीकरण तुर्तास तरी थांबवलेले दिसत आहे. मालिकांचे चित्रीकरण कधी सुरू होणार? या प्रतीक्षेत मालिकेतील हे कलाकार सध्या आपापल्या घरीच बसलेले आहेत. निखिल चव्हाण, अनुष्का सरकटे, साईंकीत कामत , पूजा पवार या सर्वांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. तर रात्रीस खेळ चाले या मालिकेचे चित्रीकरण लवकरच सुरू करण्याच्या तयारीत आहेत मात्र चित्रीकरणासाठी असलेला नाईकांचा भव्य वाडा हवा तसा मिळत नसल्याने हे काम थोडेसे रखडलेले पाहायला मिळते आहे. झी मराठीवरील या मालिकांप्रमाणे काही अन्य वाहिन्यांच्या मालिकांचे चित्रीकरण देखील अशाच काही कारणास्तव रखडले गेले आहे. दीक्षा केतकरची” तू सौभाग्यवती हो” ही सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली मालिका त्याचप्रमाणे अलका कुबल यांची “आई माझी काळूबाई” ही मालिका देखील गोव्यासारख्या ठिकाणी चित्रीकरण स्थळाच्या शोधात आहे. मात्र हवे तसे चित्रीकरण स्थळ अजूनही त्यांना मिळालेले नाही त्यामुळे मालिकेच्या ह्या सर्व कलाकारांसमोर आता पुन्हा काम कधी सुरू होणार हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.