ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन. गेल्या कित्येक दिवसांपासून राहत होते…

February 4, 2021
ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन. गेल्या कित्येक दिवसांपासून राहत होते…

झपाटलेला चित्रपटातून बाबा चमत्कारही भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेवूयात…आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे त्यांनी स्वीकारली होती. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नव्हती.

raghavendra kadkol
raghavendra kadkol

“करायला गेलो एक” हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले होते. महिन्यातून २०- २२ दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे हातच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले होते. “अश्रूंची झाली फुले” नाटकातील “धर्माप्पा” ही भूमिका त्यांच्याकडे ओघाने आली. एक कानडी व्यक्ती मराठी कसे बोलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माप्पा. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्यातील कलागुणांमुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. झपाटलेला चित्रपटावेळी त्यांचे वय ५० होते तर झपाटलेला २ वेळी त्यांचे वय ७० वर्ष इतके होते. २००३ साली ह्या चित्रपटाचा सिकवल पाहायला मिळाला होता.दोन्ही तील त्यांनी साकारलेला “बाबा चमत्कार” हा निश्चितच रसिकजनांच्या कायम स्मरणात राहील यात शंका नाही. इतके असूनही गेले काही दिवस ते बिकट परिस्थितीत जगत होते. त्यांच्या बाबतीत प्रसिद्धी मिळाली मात्र पैसे कमावता आला नाही ही खंत व्यक्त होत होती. पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर मध्ये गेल्या काही दिवसांपासून राघवेंद्र कडकोळ आणि त्यांच्या पत्नी “लतिका कडकोळ” ह्या उपचार घेत होते. आणि आज अखेर त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघी मराठी सृष्टी हळहळ व्यक्त करत आहे. राघवेंद्र कडकोळ यांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…