जय जय स्वामी समर्थ मालिकेतील “कृष्णप्पा” च्या खऱ्या आयुष्याबद्दल बरंच काही…

January 18, 2021
जय जय स्वामी समर्थ मालिकेतील “कृष्णप्पा” च्या खऱ्या आयुष्याबद्दल बरंच काही…

कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या “जय जय स्वामी समर्थ” मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अक्षय मुडावदकर यांनी या मालिकेतून स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे तर विजया बाबर हिने चंदाची आणि नित्य पवार या बालकलाकाराने कृष्णप्पाची भूमिका साकारली आहे. आज कृष्णप्पा साकारणाऱ्या चिमुरड्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… कृष्णप्पाची भूमिका “नित्य पवार” या बालकलाकाराने निभावली आहे. कदाचित बहुतेकांनी ओळखलेही असेल की हा चिमुरडा कलर्स मराठीवरील स्वामीनी या मालिकेतूनही छोट्या पडद्यावर झळकला होता.

krushnappa
krushnappa

स्वामिनी मालिकेतून छोट्या रमाबाईंचा भाऊ म्हणजेच रामचंद्रची भूमिका नित्य पवारने साकारली होती. नित्य पवार हा दादरचा, दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत तो शिक्षण घेत आहे. अभिनयाचे बारकावे शिकण्याची संधी शाळेतूनच मिळत असल्याने बालमोहनचे बहुतेक विद्यार्थी हे पुढे जाऊन कलाक्षेत्रात चमकलेले पाहायला मिळतात. नित्य पवार हा बालकलाकार देखील याच शाळेचा विद्यार्थी असल्याने शाळेच्या विविध सांस्कृतीक कार्यक्रमातून तो नेहमी सहभागी होताना दिसतो. गांधी स्मारक मुंबई आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत त्याला उत्कृष्ट अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. याशिवाय ‘मराठी कविता सादरीकरणात’ त्याने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. “बाप्पाची मुलाखत” या व्हिडीओ मार्फत कवितेचे सादरीकरण त्याने केले आहे. स्वामिनी मालिकेनंतर जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून तो सध्या कृष्णप्पाची भूमिका साकारत आहे. त्याच्या ह्या निरागस भूमिकेचे देखील खूप कौतुक होत आहे. अशा या बहुगुणी बालकलाकार नित्य पवारला आमच्या संपुर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही यशाची अशीच उंच उंच शिखरे गाठत राहो हीच सदिच्छा…