

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते ज्या वेळी मृत्यूला ओढवण्याखेरीज दुसरा पर्याय आपल्याला सुचत नाही. कालच ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी भावनेच्या भरात आपल्याला मृत्यू यावा अशी याचना एका पोस्टद्वारे केली होती. त्यावर अनके चाहत्यांनी मित्रमंडळींनी त्यांचे बळ वाढवत आयुष्य कसे सुखकर जगता येईल याबाबत कानउघडणी करणारे सल्ले दिले. चाहत्यांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रेमानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ते म्हणतात…

नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस राहत नाही. माणसाचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट का होतो याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो याला कारण त्याच्या आयुष्यातला ‘ तो ‘ क्षण. माझ्या आयुष्यात तो क्षण आला. सर्वकाही असह्य झालं. पराभव समोर उभा राहिला. आणि त्या क्षणाने घात केला.fb वर पोस्ट सोडली. कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो. लज्जित झालो. खाडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो. स्वतःला खडसावले, ‘ साल्या, लोक तुला बघून, तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत. हरणारी लढाई सुद्द्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतात ही. आणि तू ? तुला लढायला हवं. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार ? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना, मग नेत्यासारखे वाग. आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही ‘ मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्युबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार ! हर हर महादेव ! …राजन पाटील.
राजन सर तुम्ही अनेकांचे प्रेरणास्थान आहात खचून न जाता आयुष्य सुखकर कसे होईल याचा पाठपुरावा सतत करत राहा आयुष्य एकदाच मिळते आणि ते खूप सुंदर आहे याच विचाराने पुढे चालत राहा…तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..