“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली…” हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं लोकप्रिय गाणं आहे “चांदणे शिंपित जा” या मराठी चित्रपटातील. १९८२ सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते कमलाकर तोरणे यांनी तर आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा नाईक, तृप्ती अशा अनेक मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट आपल्या अभिनयाने चांगलाच गाजवला होता. चित्रपटातील हे गाणं चित्रित झालं होतं “तृप्ती” या अभिनेत्रीवर. या चित्रपटाव्यतिरिक्त तृप्ती ने महेश कोठारे यांची नायिका म्हणून “घरचा भेदी”(१९८४) या आणखी एका मराठी चित्रपटात काम केले होते.

तृप्ती ही केवळ मराठी चित्रपट अभिनेत्री नाही तर तीने अनेक हिंदी तसेच नेपाळी चित्रपटातून काम केले आहे आणि आजही ती एक नेपाळी अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. तिच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… अभिनेत्री तृप्ती हिचे पूर्ण नाव आहे “तृप्ती नाडकर”. आज तृप्ती नेपाळी अभिनेत्री म्हणून जरी परिचयाची असली तरी तीचा जन्म एका मराठी कुटुंबातच झाला आहे. २ जानेवारी १९६९ रोजी दार्जिलिंग येथे तिचा जन्म झाला. मूळचे मुंबईला स्थायिक असलेले तृप्तीचे वडील कामानिमित्त दार्जिलिंगला रवाना झाले आणि तिथेच मायादेवी नावाच्या एका गायिकेसोबत त्यांची ओळख झाली त्यानंतर दोघांनी लग्नही केले. तृप्ती ही त्यांची एकुलती एक मुलगी. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच तृप्तीने एक बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मराठी कुटुंबात जन्मलेली आणि भाषेची उत्तम जाण या कारणाने तिला चांदणे शिंपित जा, घरचा भेदी अशा मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. तिने साकारलेला “गोदाम”(१९८३)हा हिंदी चित्रपट देखील खूपच गाजला होता. गुजराथी, हिंदी चित्रपट साकारत असताना तिचे दिग्दर्शक असलेले काका ‘तुलसी घिमिरे’ यांनी नेपाळी चित्रपटात तिला प्रमुख नायिका साकारण्याची संधी दिली. वयाच्या १५ व्या वर्षी ‘कुसुमे रुमाल’ हा नेपाळी चित्रपट तिने आपल्या अभिनयाने गाजवला. “समझाना” या नेपाळी चित्रपटात तृप्तीच्या आई आणि वडिलांनीही अभिनय साकारला आहे.

मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या तृप्तीला नेपाळी भाषा फारशी येत नसल्याने या चित्रपटात तिचे डायलॉग डबिंग आर्टिस्टकडे सुपुर्त करण्यात आले होते. नावाजलेल्या नायिकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केलेल्या तृप्तीने त्यावेळी चित्रपटासाठी तब्बल दीड लाख एवढे मानधन स्वीकारले होते. आपल्या कारकिर्दीत समझाना, कोसेली, लहुरे असे ब्लॉकबस्टर सिनेमे साकारत असतानाच १९८८ साली अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचे तिने ठरवले. कुसुमे रुमाल या चित्रपटावेळी तिचे लग्न ठरले होते. दरम्यान मुंबई स्थित इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस असलेल्या व्यक्तीशी तीने लग्नही केले. लग्न होऊन घरसंसार आणि मुलांना वेळ देता यावा यासाठी मोठा निर्णय घेत अभिनयातून एक्झिट घेण्याचे ठरवले. दोन मुलांच्या जन्मानंतर तिने स्वतःचा डान्स क्लास सुरू केला. तृप्तीचा थोरला मुलगा हा मुंबईतील तिने सुरू केलेला ‘तृप्तीज् डान्स क्लास’ चालवत आहे. तर तिचा धाकटा मुलगा जाहिरात आणि टीव्ही मालिका क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या तृप्तीने अनेक वर्षांनी “आमको काख” या चित्रपटात पुनरागमन केले. “कुसुमे रुमाल २”, “कोही मेरो ” असे आणखी काही चित्रपट तिने साकारले. आज एक नेपाळी अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेली तृप्ती कधीकाळी मराठी चित्रपटातही गाजली हे एक मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. तिच्यावर चित्रित झालेलं “हे चांदणे फुलांनी …” हे गाणं तर आजही तितकेच लोकप्रिय आहे आणि कायम राहणार..