झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको “ही आगळीवेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपली संस्कृती आणि त्यावर आधारित वेगवेगळ्या सणांच्या आख्यायिका या मालिकेतून दर्शवण्यात आल्याने ही नवी संकल्पना प्रेक्षकांना खूपच भावली आहे. मालिकेचे कथानक माहीत असले तरी टीव्हीमाध्यमातून ते प्रेक्षकांसमोर कसे मांडले जाते याची उत्सुकता निर्माण झाली होती त्यामुळे पहिल्याच एपिसोडमध्ये या मालिकेने प्रेक्षकांची मने सुद्धा जिंकून घेतली हे विशेष.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून मालिकेचा पहिलाच एपिसोड कांचनमृगाचा शेला मिळवण्यासाठी सावकाराच्या पत्नीचा हव्यास भगवान शंकर कसा मोडीत काढतात हे दर्शवले होते. आज मालिकेतील सावकाराच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात… या अभिनेत्रीचे नाव आहे “प्रणाली धुमाळ”. प्रणाली मूळची अलिबागची परंतु सध्या ती मुंबईतच वास्तव्यास आहे. कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मीनारायण मालिकेतून प्रणालीने निलकांतीची भूमिका साकारली होती. प्रेमा तुझा रंग कसा, स्टार भारत वरील सावधान इंडिया, गोल गोल गरा गरा, आता बस्स अशा काही चित्रपट आणि मालिकेतून तीने आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली होती. परंतु यासर्वांमधून झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर एकदा तरी काम करता यावे ही तिची ईच्छा ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतून पूर्ण झालेली पाहायला मिळते. प्रणालीने या मालिकेतून सावकाराच्या पत्नीची विरोधी भूमिका साकारली जरी असली तरी तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. अभिनेत्री प्रणाली धुमाळला तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा..