कारभारी लयभारी मालिकेतील कांचन काकींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री

December 11, 2020
कारभारी लयभारी मालिकेतील कांचन काकींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री

कारभारी लयभारी मालिकेतील कांचन काकींची भूमिका साकारली आहे अभिनेत्री पूजा पवार साळुंखे यांनी. त्यांनी निभावलेली कांचन काकींची भूमिका विरोधी जरी असली तरी याअगोदर एक प्रमुख नायिका तर कधी सह नायिका बनून मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्यांच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात.. झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा यासारख्या दमदार चित्रपटात अभिनेत्री पूजा पवार साळुंखे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या ऑनस्क्रीन जोडीईतकीच पूजा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.

pooja pawar daughter
pooja pawar daughter

आजही हे चित्रपट तितक्याच आपुलकीने पाहिले जातात. कोल्हापूर येथे जन्मलेल्या पूजा पवार यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अभिनेते अजिंक्य देव सोबत “सर्जा” हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट साकारला आणि चांगलाच यशस्वीदेखील ठरला. यातील त्यांच्या भूमिकेलाही गौरविण्यात आले. तिथून पुढे या क्षेत्रात त्यांनी आपला चांगलाच जम बसवला. टोपीवर टोपी, एक होता विदूषक, विश्वविनायक, धोंडी यासारखे दमदार चित्रपट त्यांनी साकारले. मध्यंतरी या क्षेत्रापासून थोड्याशा बाजूला झाल्या खऱ्या परंतु धोंडी चित्रपट साकारून पुन्हा या क्षेत्रात पदार्पण केले. झी युवा वरील “बापमाणुस ” मालिकेतील त्यांच्या भूमिकेलाही रसिकांकडून चांगलीच दाद मिळाली. सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी ही आशिकी ” चित्रपटात त्यांनी लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डेसोबतही काम केले. पूजा पवार-साळुंखे यांना नताशा आणि अलिशा या दोन मुली आहेत. नताशा सध्या आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत आहे तर त्यांची थोरली मुलगी अलिशाने देखील आईच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनय तसेच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. “Mia- तनिष्क” , गिट्स, सुपरसॉनिक यासारख्या व्यावसायिक जाहिरातीत ती झळकली आहे. त्यामुळे अलिशा एक स्टार कीड म्हणून या क्षेत्रात आपला जम बसवणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. अलिशाला तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा!.