
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रक्षेपित केली जात आहे. नुलतेच “बायको अशी हव्वी!” या मालिकेचा प्रोमो पाहायला मिळाला ज्यात अभिनेता विकास पाटील मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर प्रमुख नायिकेच्या भूमिकेत एक नवखी अभिनेत्री पाहायला मिळत आहे. या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे “गौरी देशपांडे”. बायको अशी हव्वी या मालिकेच्या प्रोमोमधून गौरी एक गृहिणी दर्शवली असून केवळ चूल आणि मूल सांभाळणारीच बायको आपल्याला हवी असे कथेचा नायक प्रोमोमधून आपल्या मित्रांना सुचवत असतो.

बायको अशी हव्वी या नव्या मालिकेमुळे कलर्स मराठीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याकडे लक्ष लागून राहिले आहे. जीव झाला येडा पीसा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे परंतु याबाबत खात्री देता येत नसल्याने मालिकांच्या वेळेत बदल केला जाईल असेही वर्तवले जात आहे. येत्या काही दिवसातच याबाबत स्पष्ट चित्र समोर येईलच , मात्र नव्याने येणाऱ्या मालिकेचेही प्रेक्षकांनी स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेता विकास पाटील पुन्हा एकदा प्रमुख नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याने त्याच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विकास पाटील आणि अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्यासोबत अनेक नवख्या कलाकारांना या मालिकेतून अभिनयाची संधी मिळत आहे. हे नवखे कलाकार कोण आहेत त्याबाबत वेळोवेळी अधिक माहिती देत राहूच तुर्तास विकास पाटील आणि गौरी देशपांडे यांना या नव्या मालिकेनिमित्त आमच्या संपर्क टीम कडून खूप खूप शुभेच्छा…