

लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटात एकत्रित काम देखील केले आज आपण त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.. जीन्स आणि शर्ट ची आवड असूनही गावरान नवारी साडी परिधान करून “अशी ही बनवाबनवी” चित्रपटात कमळीच्या भूमिकेमुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री “प्रिया बेर्डे”. प्रिया बेर्डे यांचे लग्नाआधीचे नाव प्रिया अरुण कर्नाटकी. प्रियाचे वडील अरुण कर्नाटकी हे त्यावेळचे प्रसिद्ध निर्माते आणि छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांचे पुत्र. धोंडी धोंडी पाणी दे, चावट, लपवाछपवी, तिखट मिरची घाटावरची, बंदिवान, पाठलाग या एकामागून एक अशा हिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

अगदी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चित्रपट बनवण्याचं धाडस केलं आणि ते चित्रपट हिट देखील झाले. पुढे कर्नाटकी यांनी अभिनेत्री “लता काळे” यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्या “लता अरुण” या नावाने ओळखू लागल्या. लता अरुण या मराठी रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. अभिनेत्री माया जाधव या त्यांच्या भावजय तर अभिनेत्री नंदा कर्नाटकी याच्याशी देखील त्यांचे सख्य त्यामुळे कलेशी त्यांचे नाते घट्ट होत गेले. १९५८ साली “१० लाखाचा धनी” या नाटकात पद्मा चव्हाण, शालिनी नाईक यांच्यासोबत महत्वाची भूमिका बजावली. तर “नटसम्राट ” हे गाजलेले नाटक त्यांनी रंगभूमीवर पुन्हा नव्याने साकारले. अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेल्या “जय रेणुकादेवी यल्लमा” चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. चित्रपट आणि नाटक ह्या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होत. एवढया नामवंत घरात प्रिया बेर्डे यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी या सृष्टीत स्वतःच्या कर्तृत्वार आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. सुरवातीलाच प्रिया हिला नामांकित मराठी कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली त्यामुळे खूप कमी काळात किंवा रातोरात त्या सुपरस्टार झाल्या असं म्हणायला हरकत नाही.

“एक गाडी बाकी अनाडी” चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या सासू होत्या. आई लता अरुण आणि प्रिया बेर्डे या दोघी मायलेकी म्हणून खूप कमी जणांना माहीत असाव्यात. या दोघी मायलेकिनी “एक गाडी बाकी अनाडी” चित्रपटात एकत्रित काम केले होते. विशेष बाब म्हणजे याच चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती तर प्रिया बेर्डे या प्रेयसीच्या भूमिकेत दिसल्या. लता अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एकमेकांना खूप आधीपासूनच स्टेज शोमुळे ओळखायचे. १९९० साली लता अरुण जेव्हा खूप आजारी पडल्या त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या घरी जात. आणि इथेच लक्ष्या आणि प्रिया दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. यातच अंथरुणाला खिळून असलेल्या लता अरुण यांचे निधन झाले. यानंतर तब्बल ७ वर्षांतच्या प्रेमानंतर अभिनेत्री प्रिया ह्यांनी १९९७ साली लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांनी आपले लग्न उरकले. लक्ष्मीकांत आणि प्रिया यांचा संसार फुलत असतानाच काही वर्षातच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला. पण मराठी रसिकांच्या मनातला हा अभिनेता सर्वांच्याच कायम लक्षात राहील.