आजकाल अभिनय क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात येण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागत नाहीत असे म्हटले जाते. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा (अन्य पर्यायी माध्यमं) युट्युबवर आपल्या कलेचा एखादा व्हिडीओ अपलोड करून ती प्रसिद्धी मिळवणे सहज शक्य झाले आहे. परंतु ही माध्यमं उपलब्ध होण्याअगोदर मात्र अशा कलाकारांना अपार मेहनतीशिवाय पर्याय नसायचा हेच खरे. अशाच मेहनतीच्या जोरावर आज कित्येक कलाकारांनी या क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले आहे. त्यातच मराठी सृष्टीतील एक देखणा अभिनेता आणि ऍक्शन हिरो म्हणून नावारूपास आलेल्या संतोष जुवेकरला देखील हे कष्ट चुकलेले नाहीत. त्याच्या आयुष्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात…

१२ डिसेंबर १९८४ रोजी जन्मलेल्या संतोष जुवेकरने आज मराठी चित्रपट तसेच नाट्य, सृष्टीसोबतच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु इथपर्यंत येण्याचा त्याचा हा प्रवास मात्र खूपच खडतर होता असे तो एका मुलाखतीतून सांगतो. अभिनयाची भयंकर आवड असलेल्या संतोषने दहावीच्या शिक्षणानंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेज आटोपल्यावर दुपारी जेवण करून आईने खरेदी केलेल्या साड्या दारोदार हिंडून विकणे हा त्याचा नित्यक्रम असायचा. मग दुपारीच साड्या घेऊन बिल्डिंगमध्ये दारोदार हिंडावे लागत. यातून त्याला कित्येक अडचणींना सामोरे जावे लागत असे. दाराची बेल वाजवून ‘साडी घेता का?’ विचारल्यावर लोकं ‘नाही’ म्हणत खाडकन तोंडावर दार आपटायचे , अपमान करायचे. यांना आत का सोडलत? म्हणून ओरडायचे. हे सर्व बघून ‘ मी काय फालतू आहे काय? चोरी करायला आलोय काय?’ असा विचारही त्याच्या मनात येत असे. एकदिवस हे सर्व अनावर झाल्यावर घरी जाऊन तो रडू लागला. ‘मला हे असलं काम करायचं नाही, मी दारोदार जाऊन साड्या विकणार नाही.. चार लोकं अपमान करतात हाकलून देतात’ म्हणत त्याने आईला हे काम करण्यास नकार दिला होता. त्यावर आईने समजावून सांगितले की ,’ जा तू आपलं काम कर, एक दिवस हीच लोकं तुझा चेहरा बघून दरवाजा उघडतील’ … पुढे जाऊन आईचे हेच शब्द खरे होतील याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी कोणी केली नसावी. पुढे कॉलेजमध्ये असताना संतोषने अनेक नाट्यस्पर्धा गाजवल्या. दरम्यानच्या काळात त्याने नोकरी देखील केली परंतु अभिनय हीच आपली आवड म्हणून हातच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. जेव्हा ही बातमी त्याच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनी पानाचा डब्बा फेकून मारला होता. वडील नेहमी रागवायचे परंतु आईने कायम प्रोत्साहन दिले त्याचेच हे यश असे तो म्हणतो. अभिनयाबाबतही त्याचे स्पष्ट मत आहे की, ऍक्टर होणं म्हणजे स्वतःला ऍनालाईज करणं की,’ मी हे करू शकतो का?’ कारण ऍक्टिंग ही एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला शिकवून नाही होत…’