

पुराणात वामन अवतार हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. विष्णूच्या बाटु अवतारातील वामन अवताराने अनेक कार्य सिद्धीस घडवून आणले होते, हा झाला पौराणिक कथेचा एक भाग परंतु आजच्या घडीला शारीरिक खुजेपणा हा समाजात चेष्टेचा विषय बनलेला पाहायला मिळतो. अशा व्यक्ती केवळ मनोरंजन करण्याच्या कामाचे असतात अशी भावना कुठेतरी रुजवलेली पाहायला मिळते. याच गोष्टीला छेद देण्याचे काम केले आहे मराठमोळा कलाकार “महेश जाधवने”.

खलनायकी ढंगाचा बाज असलेल्या लागींर झालं जी मधला ‘टॅलेंट’ असो किंवा कारभारी लयभारी मधील्या ‘जगदीशराव पाटील’ची भूमिका असो या भूमिकांमुळे महेश जाधव प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करून गेला. या भूमिकांमुळे कुठेतरी तो प्रेक्षकांना आपल्याप्रति राग निर्माण करण्यास पात्र ठरतो हीच त्याच्या अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल. अर्थात या यशाचे सर्व श्रेय तो नेहमीच तेजपाल वाघ यांनाच देतो, त्यांच्याचमुळे मला या भूमिका जगण्याची नामी संधी मिळाली असे तो सांगतो. यात झी मराठी वाहिनीचाही वाटा तितकाच मोठा आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु मागे वळून पाहताना महेश कुठेतरी भावुक झालेला पाहायला मिळतो. लहानपणी आपली उंची इतर मुलांसारखी वाढत नाही यामुळे तो पुरता खचून जायचा, स्वतःचा रागही यायचा. आपण इतर मुलांसारखे नाही हीच भावना त्याच्या मनात घर करून गेली होती. लोकं हसायचे, चिडवायचे, हिडीसफिडीस करायचे या गोष्टींमुळे त्याला फार त्रास व्हायचा. आज एवढे यश मिळाल्यानंतर हेच लोक मला ‘माझ्या गावचा आहे, नातेवाईक आहे म्हणून आता ओळख दाखवतात’. एका भावनिक पोस्टद्वारे तो म्हणतो की…

” नमस्कार मी महेश जाधव, आज लिहायचा विषय की माझ्या किंवा माझ्यासारख्या लोकांकडे जन्मापासून बघण्याचा दृष्टिकोन कायम विनोदी पद्धतीनेच बघितला जातो आणि हे लोक जास्तीत जास्त काय तर विनोदी भूमिका तसेच सर्कशीमध्ये जोकरच काम करतात पण त्याच जोकरच महत्व पत्त्याच्या पानात इतकं असत की ज्याच्याकडे तो असेल तो कुठल्याही पानाला लावून तो विजयी होतो. माझ्या आयुष्यात केव्हा वाटलं नव्हतं की मला अशी एक वेगळी भूमिका करायला मिळेल. याआधी तुम्ही पाहिलेला टॅलेंट आणि आताचा जगदीश हे फक्त झी मराठी आणि तेजपाल वाघ यांच्या लेखणीच्या प्रेमामुळे तुम्हाला पाहायला मिळाला आणि तुम्ही रसिक मायबाप जे प्रेम देत आहात असेच प्रेम करत राहा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद…” महेशने लिहिलेल्या या पोस्टला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळाला. महेशने त्याच्या आजवरच्या जवळपास ३ वर्षाच्या कारकिर्दीत प्लॅंचेट सारखे विनोदी नाटक असो वा लागींर झालं जी, टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या, कारभारी लयभारी अशा विविध मालिकांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. यशाच्या अशा अनेक पायऱ्या तो एक एक करत यशस्वीपणे चढत राहो हीच एक सदिच्छा…