भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपट साकारला होता. त्याकाळी स्रियांनी चित्रपटात काम करणे गैर मानले जायचे त्यामुळे स्त्री पात्र देखील पुरुषांनीच साकारलेली पाहायला मिळत असत. त्याच वर्षी त्यांनी ‘मोहिनी भस्मासुर’ हा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. यात प्रथमच दुर्गाबाई कामत यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती तर त्यांची मुलगी कमलाबाई कामत ह्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली अभिनेत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. पुढे त्यांची मुलगी कमलाबाई कामत यांचे लग्न रघुनाथराव गोखले यांच्यासोबत झाले. चंद्रकांत गोखले हा त्यांचा थोरला मुलगा. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने चंद्रकांत गोखले यांना शालेय शिक्षण घेता आले नाही.

त्यांच्या आईनेच त्यांना घरी राहून लिहायला वाचायला शिकवले. कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांत गोखले यांनी मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्र १ चं मुख्याध्यापक पद भूषवलं होतं. आजी आणि आई कडून अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या चंद्रकांत यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासूनच नाटकात काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी ‘पुन्हा हिंदू’ या नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयासोबतच गायनाचे शिक्षणही त्यांनी घेतले होते. गदिमांनी लिहिलेल्या गीतरामायणातील दहाव्या गीताचे गायन चंद्रकांत यांनी केले होते. नटसम्राट, भावबंधन, पुरुष, बॅरिस्टर, राजसन्यस, पुण्यप्रभाव अशी नाटकं आणि माझं घर माझी माणसं, धर्मकन्या, धाकटी जाऊ, मानिनी, जावई माझा भला, रेश्माच्या गाठी,रायगडचा राजबंदी, देवघर यासारख्या चित्रपटातून भूमिका साकारल्या. काही हिंदी चित्रपटातूनही एक चरित्र अभिनेते म्हणून ते प्रेक्षकांसमोर आले. उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये. आपल्यातील एक सच्चेपणा आणि साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला. अभिनय हा त्यांचा व्यवसाय पण फक्त पैशासाठी काम करण्याची धंदेवाईक वृत्ती मात्र त्यांच्यात नव्हती, याचाच गैरफायदा अनेकांनी घेतला. केलेल्या कामाचा मोबदलाही न दिल्याने त्यांची अनेकदा फसवणूकही झाली. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना त्यांनी कधीच कुणाला दोष दिला नाही. आपल्या कारकिर्दीची दखल घेत बालगंधर्व पुरस्कार, नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

१९९९ साली कारगिल जवनांसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश त्यांनी देऊ केला होता. आपल्या स्वकमाईचे काही पैसे त्यांनी बँकेत मुदत ठेवीमध्ये गुंतवले. यातून देशाची सेवा करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी म्हणजेच ‘ क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स’ या संस्थेला बँकेतील मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाचा एक लाख रुपयाचा धनादेश दर वर्षी देण्याचा निर्णय घेतला. दर वर्षी २६ फेब्रुवारी रोजी आपली आई कमलाबाई आणि पत्नी हेमा यांच्या स्मरणार्थ हा धनादेश संस्थेकडे सुपूर्त करण्यात येतो. आयुष्याच्या अखेरीस कर्करोगाने ग्रस्त असलेले चंद्रकांत गोखले यांनी २० जून २००८ रोजी पुण्यातील जोशी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यू पाश्चातही त्यांनी सुरू केलेला सहायता निधीचा हा उपक्रम असाच चालू आहे. त्यांचा हा वारसा त्यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते ‘विक्रम गोखले’ यांनीही असाच आत्मसात केलेला पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील नाणे गावातील पौंड जवळील स्वमालकीची एक एकर जमीन त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली. ज्येष्ठ कलावंत आणि एकटे राहणाऱ्या कलाकारांना आसरा मिळावा याउद्देशाने त्यांनी आपली ही जमीन या मंडळाला मोफत देऊ केली आहे. कलेचा वारसा सोबतच निःस्वार्थपणे मदतीचा हात पुढे करणाऱ्या ह्या दोन्ही सच्च्या कलाकारांना आमचा मानाचा मुजरा…