सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान दिले हे सर्वांना परिचयाचे आहेच परंतु क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवून आणण्याअगोदर अगदी लहानवयात त्यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत नाटकांतून काम केले आहे. त्यांच्या बालपणीच्या काही गमतीजमतीना अशोक सराफ यांनी उजाळा दिलेला पाहायला मिळाला. नुकतेच अशोक सराफ यांनी चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजेरी लावली होती तेव्हा बालपणीच्या या आठवणी त्यांनी जाग्या गेल्या. त्यावेळी अशोक सराफ म्हणाले की, “लहानपणी सुनील ज्या इमारतीत राहत होता तो संघ आणि माझ्या इमारतीतील संघ या दोन्हीमध्ये दर रविवारी क्रिकेटचा सामना रंगायचा.

आम्हीही त्याच्यासोबत खेळायचो, खरं तर आम्ही खेळायचो म्हणजे आम्ही नुसते तिथं असायचो, केवळ तोच काय ते क्रिकेट खेळायचा. त्याने बॉल मारला की तो आणायला आम्ही पाळायचो त्यावेळी तो आठ-दहा वर्षांचा होता एवढ्या वयातही तो मारत सुटायचा आणि आम्ही केवळ पळत असायचो. त्याला बाद करणं म्हणजे खूपच कठीण काम . त्याच्या उभं राहण्याची खेळण्याची स्टाईल आम्ही नुसती बघत बसायचो. त्यानंतर सुनील क्रिकेट क्षेत्रात आणि मी नाटकाकडे वळलो. त्याअगोदर आम्ही दोघांनी एकत्रित “गुरुदक्षिणा” या नाटकात काम केलं होतं. या नाटकात सुनीलने कृष्ण आणि मी बलरामची भूमिका साकारली होती. या नाटकादरम्यानचा फोटो आजही त्यांच्याकडे आहे.” अशोक सराफ यांनी एक नट म्हणून सुनील गावस्कर यांचे भरभरून कौतुक केले. तो एक चांगला नट आहे असेही ते म्हणाले. सुनील गावस्कर यांनी ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘मालामाल’ या आणखी एका हिंदी चित्रपटात पाहुण्याकलाकाराची भूमिका त्यांनी बजावली होती. खूप कमी जणांना माहीत आहे की “या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…” हे एक मराठी गाणं त्यांनी गायलं आहे.