चंदेरी दुनियेत काम करत असताना प्रत्येक कलाकाराला चांगल्या- वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते मग यात छोटा कलाकार असो किंवा मोठा प्रत्येकाच्याच वाट्याला असे अनुभव बऱ्याचदा आलेले पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेदेखील कामाच्या ठिकाणी अस्वच्छ टॉयलेटच्या मुद्द्यावरून एक पोस्ट शेअर केली होती. तिने उपस्थित केलेला हा मुद्दा कलाकारांनी उचलून तर धरलाच शिवाय सोशल मीडियावरही या मुद्द्याची दखल घेण्यात आली होती. तर बहुतेक कलाकारांनी काम केलेले असतानाही वेळेवर पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती.

याच मुद्द्याला अनुसरून अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने देखील नुकतीच एक पोस्ट केली आहे. त्यात तिला आलेला अनुभव तिने व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये ती नेमकं काय म्हणाली पहा…आम्ही कलाकार चॅनल कोणताही असो निर्माता कोणीही असो आम्ही कलाकार नेहमीच आपल्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करूनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे ,योग्य आहे? अनेक वेळा अस होत की आपण खूप प्रामाणिक पणे आपले काम(शूटिंग) करतो…आपलं प्रोजेक्ट हे आपलं बाळ आहे आणि प्रॉडक्शन हाऊस हे आपलं घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घर घरच्यांशी, प्रॉडक्शन हाऊस कडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, प्रॉडक्शनहाऊसच्या Missmanagement शी adjustment करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात… चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत…अनेक कारणं वारंवार मिळत असतात… आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला ह्या तत्वांतर्गत काम करत असतो…

मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येऊन पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळणं हे योग्य आहे का?कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना ,तंत्रज्ञानांना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली परंतु आमच्या निर्मात्याने कोणालाही पैसे दिले नाही…निर्मात्याच्या अडचणींच्या वेळेस, episodesची Bank नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे costumes नाही म्हणून घरून आपले costumes आणून शुटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चूक आहे का? आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भीक मागितल्यासारखा सतत मागत राहणे हे योग्य आहे का? ” असे म्हणून निर्मात्याप्रति मृणाल ने आपला रोष व्यक्त केला आहे. यासोबतच “गेली काही वर्षे मी टेलिव्हिजन माध्यमात काम करतेय…कायम सहकार्य करणारेच निर्माते मिळालेत…मात्र असा अनुभव पहिल्यांदाच आला…कोणाच्याही वाट्याला असा अनुभव येऊ नये यासाठी मी ही पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केलाय.” मृणालने उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी देखील पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो आहे.