रात्रीस खेळ चाले२ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेनंतर अपूर्वा नेमळेकर हिने झी युवा वाहिनीवरील तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मीची भूमिका साकारली आहे. ‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथेभोवती फिरताना दिसते. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमळेकर यामध्ये ‘पम्मी’ नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारत होती. परंतु अपूर्वा नेमळेकर आपल्या वैयक्तिक कारणास्तव मालिका सोडत असल्याने मालिकेत मोठा बदल घडून येत आहे. पम्मीच्या भूमिकेत आता अभिनेत्री “प्रतीक्षा जाधव ” झळकणार असल्याने या भूमिकेबाबत ती फारच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे.

देवमाणूस या मालिकेतून प्रतीक्षाने साकारलेल्या मंजुळाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.मराठी नाटक , मालिका, चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रतीक्षा जाधव झळकली आहे. मूळची पुण्याची असलेल्या प्रतिक्षाने कॉलेजमध्ये असताना नाटकांतून काम केले आहे. छोटी मालकीण, मोलकरीणबाई, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिका तसेच चला खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, भुताचा हनिमून, सौभाग्य माझं दैवत, खेळ आयुष्याचा हे मराठी चित्रपट तीने साकारले आहेत. दिल ढुंडता है, क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसोबतच एका दाक्षिणात्य चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग बनली आहे. परंतु या सर्वातून देवमाणूस मालिकेतील मंजुळा ही भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे या भूमिकेमुळे प्रतिक्षाला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय झी युवा वरील मालिकेतून एक तगडी भूमिका साकारण्याची संधी देखील मिळाली आहे. अपूर्वा नेमळेकर हिने ही मालिका का सोडली आहे हे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी लवकरच झी मराठीवर रात्रीस खेळ चाले या मालिकेचा सिकवल येणार आहे. त्यामुळे अपूर्वा पुन्हा एकदा या मालिकेत काम करणार आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे. याच कारणामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे का ? असा प्रश्न तिच्या मालिका सोडण्यामुळे उपस्थित होत आहे. कारण काहीही असो ते लवकरच प्रेक्षकांसमोर उघड होईल पण तुर्तास अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला नव्याने साकारत असलेल्या पम्मीच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…