टीम इंडियाचा विजयवीर अजिंक्य रहाणेचं आज मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत 2-1 ने पराभव करुन, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या जबरदस्त कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेचं मुंबई नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं. आज प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या तोंडात अजिंक्य रहाणेच्या संयमी कामगिरीचा बोलबाला पाहायला मिळतो आहे मग त्यात आपले मराठी कलाकारही कसे मागे राहतील.

नुकतेच अभिनेते अजिंक्य देव यांनीही अजिंक्य रहाणेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. या कौतुकात त्यांनी अजिंक्य रहाणेच्या नावामागचे गुपित सांगितले आहे. हे गुपित त्यांच्याच पोस्टद्वारे जाणून घेऊयात… “अजिंक्य रहाणे हे नाव सध्या प्रत्येकाच्या ओठावर आहे. रहाणेने आपल्या नावाप्रमाणे ‘अजिंक्य’ अशी कामगिरीही केली आहे. ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मैदानावर पराभूत करत बोर्डर-गावसरकर कसोटी मालिका खिशात घातली आणि चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर रहाणे यांनी त्याचं नाव अजिंक्य का ठेवलं यामागची एक खास बात ‘मटा’सोबत बोलताना सांगितली आहे. नावाप्रमाणे अजिंक्य हा आपल्या देशासाठी तशा प्रकारची कामगिरी करत आहे. अजिंक्यचा जन्म झाला तेव्हा मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव चांगलं काम करत होता. अजिंक्य देवच्या नावावरून आम्ही माझ्या मुलाचे नावही अजिंक्य ठेवलं असल्याचं मधुकर रहाणे यांनी सांगितलं. दरम्यान, अजिंक्य रहाणे आत्तापर्यंत ज्या ज्या कसोटीमध्ये भारताचं कर्णधारपदी राहिला आहे त्यामध्ये त्याने एकही कसोटी सामना हरलेला नाही. त्यात आता ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा त्यांच्याच भूमित पराभव करत आपला विक्रम नावाप्रमाणे अबाधित ठेवला आहे.” आपल्याच नावावरून अजिंक्य रहाणेच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले याचे समाधान अजिंक्य देव यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केले आहे.