अग्गबाई सासूबाई मालिकेतील विश्वासची भूमिका साकारणारा “भाग्येश पाटील” हा कलाकार आता आणखी एका मालिकेतून एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका आहे सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेने लीप घेतली असून एक नवे पर्व सुरू करण्यात आले आहे. या नव्या पर्वात डॉ अमोल कोल्हे हे छत्रपतीशिवाजी महाराजांच्या तर नीना कुलकर्णी ह्या जिजामतोश्रींच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.अग्गबाई सासूबाई मालिकेतील विश्वास अर्थात भाग्येश पाटील देखील या मालिकेतून महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका आहे “संभाजी कावजी कोंढळकर” यांची.

अफजल खान भेटी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत मोजकेच मावळे घेतले होते संभाजी कावजी कोंढळकर हे त्यातीलच एक. ही ऐतिहासिक भूमिका वाट्याला आल्याने भाग्येश पुरता भारावून गेला आहे. याअगोदर भाग्येशने तुला पाहते रे या झी वाहिनीच्या मालिकेत पत्रकाराची छोटीशी भूमिका बजावली होती. सोनी मराठीवरील “हम बने तुम बने” , झी युवा वरील “आम्ही दोघी” यासोबतच मोरया मोशन्स प्रोडक्शन प्रस्तुत “हे विठ्ठला” ,”पंख” या शॉर्ट फिल्म तसेच स्ट्रगलर साला मधूनही त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती. अग्गबाई सासूबाई मालिकेतील विश्वास हे त्याने साकारलेले पात्र प्रेक्षकांना खूपच भावले आहे. याच भूमिकेप्रमाणे नव्याने साकारत असलेल्या ऐतिहासिक भूमिकेवर देखील प्रेक्षक तितकेच प्रेम करतील अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. प्रथमच ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने भाग्येशने जगदंब क्रिएशन्स तसेच मालिकेच्या टीमचे आभार मानले आहेत. मालिकेत साकारत असलेल्या संभाजी कावजी कोंढळकर यांच्या भूमिकेसाठी भाग्येश पाटील याला खूप खूप शुभेच्छा…