roshan shinge marathi actor

लॉकडाऊन दरम्यान १४ रुपयाला कोथिंबीर विकणारा हा विक्रेता खूपच चर्चेत आला होता. लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला हा तरुण कोथिंबीरच्या गड्ड्या आपल्या दोन्ही हातात धरून एक विशिष्ट आणि हटके (आयपीएलच्या चिअरगर्लप्रमाणे) अंदाजात साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसला. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हा विक्रेता अशा विशिष्ट पद्धतीने भाजी विक्री करताना दिसल्याने सोशल मीडियावर त्याला ‘सेल्समन ऑफ द ईअर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मुळात आपल्या अंगी असलेल्या कालागुणांचा योग्य वापर कसा करावा हे एका कलाकाराला चांगलेच ठाऊक असते. व्हिडिओत दिसणारा हा तरुण कोणी विक्रेता नसून तो एक मराठी कलाकारच असल्याचे समोर आले आहे.

marathi actor roshan
marathi actor roshan

या हरहुन्नरी कलाकाराचे नाव आहे “रोशन शिंगे”. रोशन शिंगे याच्यावर भाजी विकण्याची ही वेळ का आली याचा किस्सा जाणून घेऊयात…रोशन हा एक विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो. विक्रोळी येथे तो राहत असून लॉकडाऊनपूर्वीच “रघू ३५०” या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तो पुण्यात आला होता. १९ मार्च रोजी या प्रोजेक्टचे काम सुरू करण्यात येणार होते. परंतु अनेक दिवस उलटूनही लॉकडाऊनचा कालावधी वाढतच जाऊ लागला. या कारणाने रोशन पुण्यातील आपल्या बहिणीकडे राहू लागला. येणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे आणि घरखर्चाला हातभार लागावा म्हणून त्याने भाजी विकण्याचा निर्णय घेतला. मित्राकडून उसने पैसे घेऊन त्याने हा व्यवसाय आसपासच्या परिसरात सुरू केला. गिऱ्हाईकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने अनोखी शक्कल लढवत कोथिंबीर विकण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीतच हिट ठरला. रघु ३५० हा आगामी चित्रपट तो साकारत असला तरी याआधी त्याने ‘अनोळखी प्रीत ‘ चित्रपटात काम केले आहे. परंतु हा चित्रपट काहीस रखडल्यामुळे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र लॉकडाऊनच्या आलेल्या परिस्थितीमुळे हताश न होता त्याने सुरू केलेल्या भाजीविक्रीच्या व्यवसायातून होणारा फायदा हा त्याला नक्कीच पुढे आयुष्यात कुठे ना कुठे तरी कामी येईल अशी आशा आहे आणि तसेच होवो ही एक सदिच्छा देखील आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *