आजच्या सदरात मराठी सृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार “मधू आपटे” यांच्याविषयी जाणून घेऊयात. “मधू आपटे के साथ काम करते वक्त अच्छि ऍक्टिंग करके कोई फायदा नहीं…लोग तो मधूकोही देखेंगे” एका अडखळत आणि बोबड्या बोलीतील मधू आपटे या कलाकाराने हिंदी आणि मराठी सृष्टीत आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करून हिंदी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ओमप्रकाश यांच्याकडून ही दाद मिळवून घेतली होती. मधू शंकर आपटे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. वडिलांचे निधन झाल्यावर मधूसह दोन भावंडांचा सांभाळ आईनेच केला. भावाच्या घरी राहून आईने घरची जबाबदारी सांभाळत लोणची, पापड विकण्याचा व्यवसाय सुरू केला. वयाच्या नवव्या वर्षी अतितापाने मधू आपटे यांची वाचा गेली.

मिरजेच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर घश्याची शस्त्रक्रिया केली तेव्हा मधू यांना अडखळत का होईना बोलता येऊ लागले आणि हेच बोलणे त्यांची खरी ओळख बनून गेली. सुंदर हस्ताक्षर आणि शालेय शिक्षणात हुशार असूनही घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना केवळ पाचवी पर्यंतचेच शिक्षण घेता आले. त्यांचे मामा ‘प्रभात’ मध्ये कामाला लागले त्यांच्याच ओळखीने मधू आपटे यांना तिथेच पेंटिंग खात्यात काम मिळाले. खूप कष्टाची काम करायला लागत असल्याने मधू आपटे याना ती झेपत नसायची पण तरीदेखील कशीबशी त्यांनी येथे वर्षभर नोकरी केली. ओघानेच त्यांचे बोलणे शांताराम बापुनी ऐकले होते त्यांनी “संत तुकाराम” चित्रपटात मधू आपटे यांना सालोमालोची भूमिका दिली. या अफलातून भूमिकेने मधू आपटेंचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले आणि प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. १९५४ साली प्रभात कंपनीचा लिलाव झाला त्यानंतर मधू आपटे यांनी चित्तरंजन कोल्हटकर आणि सीताकांत लाड यांच्या मदतीने आकाशवाणीत काम मिळवले. इथे काम करत असतानाच त्यांना नाटकाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. भावबंधन हे नाटक साकारत असताना लता मंगेशकर यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली परंतु इथेही जम न बसल्याने मुंबईला जाऊन ‘फिल्मीस्तान’ मध्ये नोकरी स्वीकारली. सुलोचनादीदी शूटिंगसाठी जात असताना मधू आपटे त्यांच्यासोबत जात असत. इथेच हिंदीतील अनेक निर्मात्यांनी मधू आपटे यांना आपल्या चित्रपटांतून छोट्या मोठ्या भूमिका देऊ केल्या.

चित्रपटात त्यांच्या वाट्याला खूप छोट्या भूमिका आल्या असल्या तरी त्यांच्या अफलातून अभिनयाने ते आपले विनोदी पात्र चांगलेच रंगवु लागले होते. त्यांचे बोबडे आणि अडखळत बोलणे हीच त्यांची खरी ओळख बनत गेली आणि त्यांच्या भूमिका चित्रपटात आवर्जून घेण्यात येऊ लागल्या. मराठीतील घनचक्कर, ग्यानबाची मेख, सतीच वाण, आधार, ऐकावं ते नवलच, माझा पती करोडपती अशी हिंदी मराठीतील मिळून त्यांनी जवळपास २०० चित्रपट साकारले होते. ‘अशी ही बनवाबनवी’ या धमाल चित्रपटात त्यांच्या वाट्याला देखील छोटीशी भूमिका आली होती. मी व्ही…नस कंपनीतून आलोय असे म्हणत त्यांच्या वाट्याला आलेला घो…घो…घो पण नाही आणि ळा पण नाही ( घोटाळा) हा संवाद विसरणे केवळ अशक्यच. खरं तर त्यांनी साकारलेल्या या अफलातून भूमिका त्यांच्याचकडे पाहून लिहिल्या असाव्यात अशी पुसटशी शंका मनात येते…आणि अखेर १३ मार्च १९९३ रोजी या हरहुन्नरी कलाकाराने या जगाचा निरोप घेतला. आपले व्यंग हीच आपली खरी ओळख बनून जाईल याची जाणीव या कलाकाराला निश्चित झाली असावी…नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *