shahikala actrss

आजवर अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूड क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हेच मराठी कलाकार आजही हिंदी भाषिक मालिकांमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका बजावताना दिसतात. ह्यातच एके काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री “शशिकला” यांची ओळख करून द्यावीशी वाटते. सुरुवातीच्या काळात प्रमुख अभिनेत्री म्हणून जम बसवू पाहत असलेल्या या अभिनेत्रीने खलनायिकेच्या भूमिका साकारून आयुष्याला कलाटणी दिली. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… ४ ऑगस्ट १९३२ साली सोलापूर येथिल एका सधन कुटुंबात अभिनेत्री “शशिकला जवळकर” यांचा जन्म झाला. वडील सोलापूर जिल्ह्यातील नामवंत व्यावसायिक म्हणून ओळखले जात.

marathi bollywood actress
marathi bollywood actress

त्यामुळे शशिकला यांचे बालपण अगदी ऐशोआरमात गेले. तीन भाऊ आणि दोन बहिणी असे त्यांचे कुटुंब त्यातील शशिकला ह्या जवळकर कुटुंबातील पाचवे अपत्य. लहानपणापासूनच शशिकला यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. ही आवड त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात जोपासली. पुढे शशिकला यांच्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला आला. त्यांचे सधन आणि सुखी कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. त्यांच्या काकांनीच हे कारस्थान केल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. मग त्यांच्या वडिलांनी संसारासाठी हातभार लागावा म्हणून मुंबईला येण्याचे ठरवले. तिथेही त्यांना जम बसवणे कठीण होऊ लागले. अशा परिस्थितीत शशिकला यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याची कामे केली. पुढे नूर जहाँ यांच्याशी ओळख झाली. त्यांचे पती शौकत रिझवी यांनी शशिकलाला “झीनत” चित्रपटात कव्वाली करण्याचे काम दिले. या भूमिकेसाठी त्यांना त्याकाळी २० रुपये मिळाले होते. या २० रुपयात त्यांनी आपल्या भावंडाना नवीन कपडे घेतले, स्वतः ला २ साड्या घेतल्या. बऱ्याच वर्षानंतर अशी दिवाळी साजरी केली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. यानंतर शौकत रिझवी यांनी उर्दू शिकण्याच्या बोलीवर ३ वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले.

shahikala jawalkar actress
shahikala jawalkar actress

१९४७ साली “जुगनू” चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका साकारली. पुढे काम मिळावे म्हणून त्यांचा स्ट्रगल चालूच राहिला.१९६२ सालच्या “आरती” चित्रपटात त्यांना विरोधी भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे शशिकला यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. परंतु चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तिला खूप समजावून या भूमिकेसाठी राजी केले. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली आणि फिल्म फेअर सारखे अनेक पुरस्कार आपल्या पदरात पाडली. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या. पुढे ओम प्रकाश मेहरा ह्यांच्यासोबत शशिकला यांनी प्रेमविवाह केला. प्रसिद्ध गायक के एल सेहगल यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नाते होते. शशिकला याना दोन मुलीही झाल्या. पुढे त्याच त्याच खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. ह्याचा परिणाम त्यांच्या सुखी संसारावर पडू लागला. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादामुळे शशिकला यांनी आपल्या मुली, घरदार यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. एका व्यक्तीसोबत जाऊन त्या परदेशी स्थायिक झाल्या. परंतु त्या व्यक्तीनेही त्यांना धोका दिला. त्यांचा हाच निर्णय त्यांना खूप मोठा धक्का देऊन गेल्याने त्या आणखीनच खचल्या. चारधाम, काशी या सारख्या धार्मिक स्थळाना भेटी देत राहिल्या. मग कलकत्त्यात जाऊन मदर टेरेसा सोबत राहून रोग्यांची सेवा करू लागल्या. तिथे ९ वर्षे त्यांनी ही सेवा करून पुन्हा मुंबईला येण्याचे ठरवले. इथे आल्यावर आपली थोरली मुलगी कॅन्सरच्या आजाराने निधन पावल्याचे समजले. मग धाकटी मुलगी आणि नातवंडे यांच्यासोबत त्या राहू लागल्या. नव्याने चित्रपट क्षेत्रात येऊन आपला जम बसवत आजीच्या भूमिका लीलया पार पाडल्या. छोट्या पडद्यावरील किसे अपना कहें, सोनपरी, जिना इसी का नाम है मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या. शशिकला आता ८६ वर्षाच्या झाल्या आहेत. आपली धाकटी मुलगी आणि नातवंड यांच्यासोबत त्या मुंबईत राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *