वडिलांच्या अपंगत्वामुळे उच्चशिक्षित असलेल्या ज्योत्स्नाने आयटीचा जॉब सोडून केले हे काम…आज करतेय लाखोंची उलाढाल

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लोणवाडी हे “ज्योत्स्ना दौंड” हिचे गाव. तिचे वडील विजय दौंड हे गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्षाची शेती करत होते. १९९९ सालच्या एका भीषण अपघातात त्यांना अपंगत्व आले. उपचार घेऊन दुखण्यातून सावरत कसेबसे ते पुन्हा शेती करण्याकडे वळले परंतु त्यांचे दुर्दैव असे की २०१० मध्ये पुन्हा एका अपघाताने त्यांना कायमचे अपंगत्व आले. मग घर सावरण्यासाठी पत्नी लता यांनी खंबीर होऊन शेतीचा भार उचलला. मुलगा ऋषिकेश लहान असल्याने शाळेत शिकणाऱ्या ज्योत्स्नाला हाताशी घेऊन पुढे शेतीतून उत्पन्न मिळवू लागले. यादरम्यान शाळा सांभाळत ज्योत्स्नाने शेतीविषयक असणारे सर्व बारकावे शिकून घेतले.

लाईटच्या बेभरवश्यामुळे रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी भावाची मदत घेतली. कौटुंबिक परिस्थितीची तिला जाणीव होती त्या परिस्थिवर मात करत जिद्दीने अभ्यास करून ओझर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल महाविद्यालयात संगणक शास्त्रात एमसीएचे शिक्षण घेतले. अभ्यासात हुशार असलेल्या ज्योत्स्नाने परीक्षेत उत्तम गुण मिळवून नाशिक येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवली. यातच करिअर करण्यासाठी तिच्याकडे मोठी संधी असताना घरच्या शेतीकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव तिला होत होती. अखेर दीड वर्षाच्या नोकरीवर पाणी सोडत तिने शेती करण्यावर भर देण्याचे ठरवले. द्राक्ष शेतीत उत्कृष्ट कामगिरी करून तिने “आदर्श महिला द्राक्ष उत्पादक” चा ‘किताब पटकावला. याची दखल घेत “कृषिथॉन बेस्ट वुमन फार्मर अवॉर्ड” नेही तिला गौरवण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने महिला गौरव पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे. एवढेच नाही तर विविध मेळाव्यांमध्ये तिच्या या कर्तृत्वाची महती सांगितली जाते.
स्वतः उच्च शिक्षित असल्याने शिक्षणाचे महत्व तिला माहीत आहे आपल्या लहाण भावाला ऋषीकेशला कम्प्युटर सायन्सच्या पदवीचे शिक्षण घेण्यास तिने मदत केली . एका चांगल्या कंपनीत आता त्याने नोकरी मिळवली आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतुन तिने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणा देणारे ठरत आहे. हताश होऊन बसण्यापेक्षा ज्योत्स्नाने दाखवलेली ही जिद्द आजच्या तरुणांना प्रोत्साहन देईल यात शंका नाही.
काही लाख पगाराच्या नोकरीपेक्षा तिचे पाऊल शेतीकडे वळले आणि स्वकर्तुत्वाने तिने इथपर्यंत मजल मारली याचा तिच्या वडिलांना सार्थ अभिमान वाटत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *