दूरदर्शनवर ८० च्या दशकात “रामायण” ही मालिका प्रसारित होत होती. श्रीराम च्या भूमिकेत अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत दीपिका चिखलिया यांनी आपल्या अभिनयाने ही मालिका गाजवली होती. खरं तर मालिकेचे सर्वेसर्वा रामानंद सागर यांनी पुढेही अशा अनेक धार्मिक, अध्यात्मिक मालिकांची निर्मिती केली त्या सर्वच मालिका एका चढ एक सरस ठरल्या. मालिकेतील रावणाची भूमिका देखील चांगलीच भाव खाऊन गेली होती आजही तो चेहरा पाहिल्यावर खरा रावण असाच असावा असे प्रत्यक्षात भासते. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “अरविंद त्रिवेदी”. मुळात अरविंद त्रिवेदी हे मालिकेत दुसऱ्याच एका भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते परंतु त्यांची शरीरयष्टी रामानंद सागर याना खूपच भावली आणि त्यांनी चक्क रावणाच्या भूमिकेसाठीच अरविंद त्रिवेदी यांची निवड केली.

रावणाची ही भूमिका तितक्याच नेटाने सांभाळून अगदी अजरामर केली. ८ नोव्हेंबर १९३७ रोजी अरविंद त्रिवेदी यांचा जन्म झाला आज ते ८१ वर्षाचे आहेत. त्यांचे मोठे बंधू उपेंद्र त्रिवेदी हे रंगभूमीवरील जाणते कलाकार त्यांच्याच प्रेरणेने अरविंद यांनी देखील अभिनय क्षेत्रात येण्याचे ठरवले.रामायण मालिकेखेरीज त्यांनी विक्रम वेताळ ही मालिका आणि आज की ताजा खबर, जंगल में मंगल, त्रिमूर्ती यासारखे जवळपास २५० हुन अधिक हिंदी गुजराथी चित्रपट त्यांनी साकारले आहेत. अभिनयासोबतच त्यांनी राजकारणात देखील सहभाग दर्शवला होता. १९९१ साली गुजराथ मधील साबरकंठा येथून लोकसभेत निवडून गेले. २००२ साली भारतीय फिल्म प्रमाण बोर्डचे (CBFC ) त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी अरविंद त्रिवेदी आता राम भक्तीत लिन झालेले पाहायला मिळत आहेत. यासोबतच ते तीर्थ क्षेत्री जाऊन भक्तांची सेवा करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *