तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेत नंदिता पर्व नुकतेच संपलेले पाहायला मिळाले. रविवारच्या विशेष भागापासून आता मालिकेत राणा आणि अंजली यांची कन्या “लक्ष्मी रणविजय गायकवाड ” हिने दमदार एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. मालिकेत लक्ष्मीचे पात्र साकारणारी चिमुरडी अल्पावधीतच साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आपल्या गोड हसण्याने आणि हुबेहूब राणा सारखं रांगडं बोलल्यामुळे ती पहिल्या भागातच प्रेक्षकांची लाडकी बनली. या लक्ष्मी रणविजय गायकवाड बद्दल अधिक जाणून घेऊयात…

मालिकेत लक्ष्मी रणविजय गायकवाड च्या भूमिकेतली ही चिमुरडी आहे “वाग्मी शेवडे”. वाग्मी आता ८ वर्षांची असून ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक आहे. त्यांचे कुटुंब मूळचे साताऱ्याचे परंतु कामानिमित्त ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. वाग्मीचे वडील अमेय शेवडे, यांनी कोथरूड एमआयटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले असून Halliburton मध्ये सिनिअर टेक्निकल प्रोफेशनल पदावर कार्यरत आहेत. तर तिच्या आईचे नाव तेजस्विनी आपटे-शेवडे असे आहे. तेजस्विनी यांनी सातारा येथुन आपले शिक्षण घेतले. त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवुन खाऊ घालण्याची भारी हौस. वाग्मी आणि तिची आई तेजस्विनी यांनी एकत्रित २०१७ साली Iconic aura women run स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी बजावत पदक मिळवले होते. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात देखील वाग्मी भाग घेताना दिसते. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत ती पाहायला मिळाली.

तुझ्यात जीव रंगला ही वाग्मीची पहिलीच मालिका आणि याच मालिकेने तिला आपली खरी ओळख मिळवून दिली. तिच्या लक्ष्मीच्या दमदार भूमिकेने साऱ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकले आहे. नंदिता वहिनीच्या मुलाशी बोलताना तिने चंदा ला दिलेला दम आणि तिची ती स्टाईल प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली. अगदी राणा आणि अंजलीची मुलगी शोभेल अशीच तडफदार आणि तितकीच प्रेमळ राजलक्ष्मी प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. राजलक्ष्मी रणविजय गायकवाड साकारणाऱ्या वाग्मीला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *