दसरा म्हटले की रावण दहन हा एक कुतूहलाचा विषय असतो. अनेक ठिकाणी उंचच उंच रावणाचे पुतळे बनवून त्यांचे दहन केले जाते. परंतु भारतात असे एक गाव आहे जिथे ही प्रथा अस्तित्वात नाही. तर या गावात चक्क एकमेकांसोबत युद्ध केले जाते जाणून घेऊयात या रूढी परंपरा विषयी अधिक… उत्तराखंड मधील जौनसार बावर प्रदेशातील उद्पालटा आणि कुरोली गावे याच साठी प्रसिद्ध आहेत. ही दोन्ही गावे दसऱ्याच्या दिवशी एकमेकांसोबत युद्धाच्या तयारीत असतात. दर वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शापापासून मुक्ती मिळावी म्हणून हे युद्ध केले जात असल्याची परंपरा आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या युद्धासाठी चक्क अळूची पाने किंवा देठ वापरले जातात. या पानाच्या तसेच देठाच्या सहाय्याने एकमेकांसोबत लढाई केली जाते.

असे करण्यामागे एक कथा सांगितली जाते ती अशी…या गावातील व्यक्ती हरी सिंह राय, राजेंद्र सिंह राय असे सांगतात, की हजारो वर्षांपूर्वी या गावात राणी आणि मुन्नी या दोन मैत्रिणी राहत होत्या. या दोघीजणी जंगलात पाणी भरण्यासाठी एकत्रित जात. एके दिवशी राणीचा पाय निसटून त्या खोल पाण्यात पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. ही बाब घरी जाऊन मुन्नीने सगळ्यांना सांगितली. तर तिच्यावरच सगळ्यांनी आरोप लावत तूच तिला मारले असल्याचे म्हटले. या भीतीपोटी तिने देखील त्याच पाण्यात उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर गावाला या मुलींचा शाप लागला असे म्हटले गेले यापासून मुक्ती मिळावी म्हणून दोन्ही कुटुंबांनी दसऱ्याच्या दिवशी गागली युद्ध सुरू करण्याची रीत पडली. अष्टमीच्या दिवशी या दोन्ही मुलींचे गवत, लाकूड यापासून पुतळे बनवले जाऊ लागले आणि ते त्या पाण्यात विसर्जित करू लागले. यानंतर या दोन्ही गावात युद्ध पुकारले जाते या प्रथेला स्थानीय भाषेत ‘पाईता पर्व’ असेही म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *