nanad bhavjaya marathi

अनेक बॉलीवूड कलाकारांचे एकमेकांत नातेसंबंध असलेले तुम्ही पहिले असतील पण काही मराठी अभिनेत्री देखील आहेत ज्यांच्यात नणंद आणि भावजय असे नाते आहे. आजच्या लेखात आपण मराठी सृष्टीतील खऱ्या आयुष्यातील “नणंद आणि भावजय” असलेल्या कलाकारांच्या जोड्या जाणून घेणार आहोत. यातील काही कलाकार हे बऱ्याच प्रेक्षकांच्या चांगल्याच परिचयाचे असतील, तुम्ही त्यांना एकत्र पाहिलं देखील असेल पण त्यांच्यात हे नातं असेल असं कदाचित माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊयात हे कलाकार नेमके आहेत तरी कोण….

lata arun and maya jadhav
lata arun and maya jadhav

१. “लता अरुण आणि माया जाधव”- दिवंगत अभिनेत्री लता अरुण या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील जाणत्या कलाकार म्हणून ओळखल्या जात. बहुतेकांना माहीत नसावे की लता अरुण या अभिनेत्री ‘प्रिया बेर्डे’ यांच्या आई आहेत. लता अरुण या पूर्वाश्रमीच्या लता काळे म्हणून परिचित आहेत. झुंज, एक गाडी बाकी अनाडी, खंडोबाची आण अशा दमदार चित्रपटातून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. लता अरुण यांचे भाऊ शहाजी काळे हे देखील नाट्य सिने कलावंत. त्यांच्या पत्नी “माया जाधव” या अभिनेत्री तसेच नृत्य समशेर, लावणीक्वीन म्हणूनही परिचयाच्या आहेत. लता अरुण आणि माया जाधव या खऱ्या आयुष्यात नणंद भावजय आहेत हे बहुतेकांना माहीत नसावे.

mrunmayee and girija oak
mrunmayee and girija oak

२. “मृण्मयी गोडबोले आणि गिरीजा ओक”- ये रे ये रे पैसा २, चि व चि सौ कां, स्माईल प्लिज अशा अनेक चित्रपटातून अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असलेल्या श्रीरंग गोडबोले यांची ती कन्या आहे. तर तिचा भाऊ “सुहृद गोडबोले” हा निर्माता म्हणून या सृष्टीत कार्यरत आहे. बाजी, चिंटू, चिंटू२ अशा चित्रपटाच्या निर्मितीचे काम त्याने सांभाळले आहे. मृण्मयी गोडबोले हिची भावजय आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “गिरीजा ओक-गोडबोले”. गिरीजाने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांसोबतच हिंदी चित्रपटातूनही काम केले आहे.

amruta deshmukh krutika
amruta deshmukh krutika

३. “अमृता देशमुख आणि कृतिका देव”- आठशे खिडक्या नऊशे दारं, फ्रेशर्स अशा मालिका आणि एक कुटुंब तीन मिनार, स्वीटी सातारकर, आजी आणि नात अशा चित्रपटातून अभिनेत्री अमृता देशमुख हिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता “अभिषेक देशमुख” हा अमृताचा सख्खा भाऊ आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. अभिषेकने ‘आई कुठे काय करते’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ‘यश’ची भूमिका गाजवली आहे. मराठी-हिंदी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री “कृतिका देव” ही अभिषेकची पत्नी आहे . पानिपत या बॉलिवूड चित्रपटात तिला राधाबाईच्या भूमिकेत झळकण्याची संधी मिळाली होती. याशिवाय बकेट लिस्ट, राजवाडे अँड सन्स, हॅप्पी जर्णी या मराठी चित्रपटासोबतच इंटरनेट वाला लव्ह ही हिंदी मालिकाही तीने अभिनित केली आहे.

sonali kulkarni amruta subhash
sonali kulkarni amruta subhash

४. “सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष”- गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या कन्नड चित्रपटातून सोनाली कुलकर्णी हिने प्रथमच चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. दिल चाहता है, सिंघम, टॅक्सी नं ९२११,मिशन काश्मीर अशा हिंदी चित्रपटासोबतच गुलाबजाम, डॉ प्रकाश बाबा आमटे, देवराई, देऊळ अशा अनेक मराठी चित्रपटात सोनाली कुलकर्णी एक दमदार अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली. अभिनेता दिग्दर्शक संदेश कुलकर्णी हा सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ. सायकल, खरवस, गुलमोहर, सखाराम बाईंडर अशा चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर आला. अभिनेत्री अमृता सुभाष ही संदेश कुलकर्णी यांची पत्नी आहे. किल्ला, गल्ली बॉय, श्वास, अस्तू, झिपऱ्या अशा हिंदी मराठी चित्रपटात अमृताने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांची नणंद भावजयची ही जोडी बहुतेकांना अपरिचित असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *