बहुतेक सर्वांनीच शालेय जीवनात “कॅम्लिन”च्या वस्तू वापरल्या असतील…”कॅम्लिन” काय आहे जाणून घ्या

बहुतेक आपण सर्वांनीच शालेय जीवनात कॅम्लिन कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरले आहेत. शाई, कंपास पेटी, मार्कर, व्हाइट बोर्ड, पेन्सिल ,रंग ह्या सर्व कॅम्लिनच्या प्रॉडक्ट्सचा वापर आपण कधी न कधी तरी केलाच आहे. १९३१ साली कॅम्लिन कंपनीची स्थापना झाली आणि आज जवळपास ८ दशकांहून अधिक काळ ह्या कंपनीने आपला जगभरात विस्तार वाढवल्याचे दिसून येते. खूप कमी जणांना हे माहीत असेल की ह्या कंपनीची स्थापना चक्क एका मराठी माणसाने केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत अधिक…

कोकणातील दांडेकर कुटुंब मुंबईत आले आणि गिरगावात स्थिरावले. परशुराम दांडेकर ह्यांना गोविंद आणि दिगंबर ही दोन मुले. गोविंद हे इंजिनिअर असून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते तर त्यांचे धाकटे बंधू दिगंबर हे बीएस्सी करून कुलब्याच्या वेधशाळेत कार्यरत होते. एक सधन कुटुंब असून सुद्धा आपण व्यवसाय करावा असे गोविंद यांच्या मनात होते. आपल्या धाकट्या भावाला नोकरी सोडून व्यवसाय करण्यास त्यांनी सुचवले. दिगंबर यांना देखील भावाचे म्हणणे पटले. गोविंद यांनी ह्यात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. १९३१ साली आपल्या दोन खोल्यांच्या राहत्या घरात त्यांनी शाई बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मग किरकोळ बाजारात ते विक्रीसाठी नेण्यात येऊ लागले. सुरुवतीला ह्या कामात त्यांना खूप अडचणी येऊ लागल्या. देशी विदेशी कंपनीच्या स्पर्धेमुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. परंतु अपार जिद्द आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर कष्ट करून दहा वर्षाच्या काळात आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले. मग हळूहळू व्यवसायाला व्यापक रूप देत औषध आणि औषध रसायन यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.१९७७ रोजी ह्या व्यवसायासाठी भव्य वास्तू उभारली. बालचित्रकार, व्यावसायिक चित्रकार यासाठी रंग साहित्य बनवले. यासोबतच त्यांनी मोठ्या स्वरूपात चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले यातून त्यांच्या वस्तूंची लोकप्रियता वाढू लागली. यातूनच पुढे ‘कॅम्लिन आर्ट फाउंडेशनची’ स्थापना झाली.
कॅम्लिन च्या प्रॉडक्ट्स वर “उंटावर प्रवास” करणाऱ्याचे चित्र आहे. असे असण्याचा उद्देश हाच की, उंट वाळवंटातही अथक प्रवास करतो त्याचा हाच गुणधर्म घेऊन दांडेकर कुटुंबीयांनी आपली भरभराट केली असल्याचे ” उंटावरचा प्रवास ” ह्या पुस्तकात सांगितले आहे. स्वतःची ब्रँड क्वालिटी निर्माण करणे आणि विविधी उपक्रमाद्वारे ग्राहकासमोर सतत येत राहणे हे कॅम्लिन च्या यशामागचे गमक आहे.

दिगंबर दांडेकरांनी सुरू केलेली ही कंपनी सुभाष, दिलीप, रजनी, माधव, शरद, शोभना या पिढीने व्यापक रूप प्राप्त करून दिले आहे. दिलीप दांडेकर वयाच्या विसाव्या वर्षांपासून कंपनीशी जोडले गेले. सुरुवातीला कंपनीचे बारकावे शिकण्यासाठी त्यांनी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी केली. अथक परिश्रम आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. दिलीप दांडेकर यांना सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारातील “उद्योगरत्न पुरस्काराने” गौरविण्यात आले.
कॅम्लिन कंपनीने कोकुयो या जपानी कंपनीसोबत भागीदारी केली. त्यामुळे कॅम्लिन सोबत कोकुयो हे नाव उत्पादनाला देण्यात आले आहे. त्यात कोकुयो कंपनीला ५०.५४ % तर दांडेकर कुटुंबाला १७.८३ % इतके भागभांडवल मिळत आहे. दांडेकर कुटुंबाला हे असे का करावे लागले हे एक मोठे प्रश्नचिन्ह त्यावेळी उपस्थित करण्यात आले. परंतु आपल्या उत्पादनाला व्यापक रूप मिळावे यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितल्याने ह्या प्रश्नावर पडदा पडला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *