मराठी माणसाने व्यवसायात उडी घेऊन आपली मोठमोठी स्वप्ने साकार करण्याचे धाडस दाखवून दिलेले अनेक दाखले मिळतात. मग यात मराठी सेलिब्रिटी कशे मागे पडतील. प्रिया आणि शंतनू मोघे (स्वराज्यरक्षक फेम-छत्रपती शिवाजी महाराज) यांचे मीरा रोडवरील “द बॉम्बे फ्राईज” नावाचे कॅफे हे देखील याचीच प्रचिती घडवून देते. यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी देखील आपले स्वतःचे असे एक हॉटेल असावे असे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. पाहुयात प्रिया बेर्डे यांचे हे हॉटेल नेमके आहे तरी कुठे ते…

कोल्हापुरात जन्म झालेल्या प्रिया बेर्डे लहानपणापासूनच तांबडा पांढरा रस्साच्या शौकीन त्यामुळे साहजिकच त्यांना स्वयंपाक बनवण्याची आवड निर्माण झाली. पुढे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत लग्न झाल्यावर बेर्डे कुटुंबात त्या दाखल झाल्या. त्यामुळे कोकणी पद्धतीचे पदार्थ शिकण्याची हौस त्यांच्यात निर्माण झाली. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते खाऊ घालणे हा त्यांचा एक आवडता छंदच बनून गेला. या छंदाचे व्यवसायात रूपांतर व्हावे ही त्यांची मनोमन ईच्छा होती त्यासाठी लोणावळा, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन जागेचा शोध सुरू केला शेवटी पुण्यातील बावधन परिसरात त्यांना योग्य ती जागा मिळाल्याने आपला व्यवसाय इथेच स्थापन करायचा असे त्यांनी ठरवले. पुण्यातील बावधन परिसरातील मराठा मंदिराजवळ “चख ले” या नावाने त्यांनी आपले स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले. सुरुवातीला पावभाजी, दाक्षिणात्य तसेच पंजाबी थाळी या सर्व व्हेज डिशेश त्यांनी सुरू केल्या.

परंतु ग्राहकांच्या आग्रहाखातर आता नॉनव्हेज जेवणाची देखील सुविधा त्यांनी करून दिली आहे. विशेष म्हणजे “पप्पू डोसा” ही इथली स्पेशालीटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इथल्या पदार्थांची चव चाखायला ठिकठिकाणचे खवय्ये याठिकाणी येऊन भेट देताना दिसतात. शिवाय प्रिया बेर्डे देखील आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून आपल्या रेस्टॉरंटला हजेरी लावतात त्यामुळे चाहत्यांना देखील कदाचित तिथे गेल्यावर त्यांची झलक पाहायला मिळेल किंवा त्यांची भेट घडून येण्याची संधी मिळेल. त्यांच्या रेस्टॉरंट मधील वेगवेगळ्या आणि चविष्ट पदार्थांची मागणी वाढल्याने या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. तेव्हा तुम्हीही या प्रिया बेर्डे यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची चव चाखायला नक्की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *