“पिंजरा” चित्रपट अभिनेत्री आता कशा दिसतात…”अशी ही बनवाबनवी ” चित्रपट फेम शंतनूसोबतचे त्यांचे नाते काय आहे

१९७२ साली “पिंजरा” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याकाळातील या तमाशाप्रधान चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपट एवढा गाजला की त्याला नॅशनल अवॉर्डने देखील नावाजले होते. डॉ श्रीराम लागू,अभिनेत्री संध्या , निळू फुले या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारताना दिसले. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही शांताराम यांचे होते. चित्रपटाला मिळालेली पसंती पाहता हाच चित्रपट त्यांनी हिंदी भाषेतून देखील काढला. चित्रपटाच्या प्रमुख अभिनेत्री संध्या यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…

संध्या यांचे लग्नाआधीचे नाव विजया देशमुख असे होते. त्यांची बहीण वत्सला देशमुख यादेखील नाटक क्षेत्रात कार्यरत होत्या. तर त्यांचे वडील नाटक क्षेत्रांतील बॅकस्टेजचे कार्य सांभाळत होते. दोघी बहिणींना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि नाटक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान मराठी हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व्ही शांताराम हे एका चित्रपटासाठी नवख्या अभिनेत्रीच्या शोधत होते. वत्सला यांनी आपल्या बहिणीला या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी पाठवले. “अमर भूपाळी” चित्रपटासाठी संध्याची निवड करण्यात आली. १९५१ सालचा हा चित्रपट एवढा गाजला की मुंबईत तो तब्बल १०४ आठवडे बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या चित्रपटाची कान्स फेस्टिव्हलने देखील दखल घेतलेली पाहायला मिळाली.
यानंतर संध्या यांनी व्ही शांताराम सोबतच हिंदी मराठीतील नवरंग, झनक झनक पायल बाजे, स्त्री चित्रपट साकारले. “दो आंखे बारा हाथ ” चित्रपटात व्ही शांताराम यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली याचदरम्यान व्ही शांताराम आणि संध्या यांचे सूर जुळू लागले. व्ही शांताराम यांचे पाहिले लग्न विमलाबाई यांच्यासोबत झाले होते. त्यांच्यापासून त्यांना प्रभात कुमार हा मोठा मुलगा( याच नावाने त्यांनी आपली कंपनी स्थापन केली) तर सरोज, मधुरा आणि चारुशीला या तीन मुली झाल्या. चारुशीला यांचा मुलगा सिद्धार्थ राय “अशी ही बनवाबनवी” चित्रपटात शंतनूची भूमिका साकारताना पाहायला मिळाला. सिद्धार्थने अनेक हिंदी मराठी चित्रपट गाजवलेले देखील पाहायला मिळाले होते. परंतु खूप वर्षांपूर्वीच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

तर मधुरा या मुलीचा विवाह प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पंडित जसराज यांच्यासोबत झाला. मधुरा आणि पंडित जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज ही देखील हिंदी भाषिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसते.
व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी “जयश्री” या हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. जयश्री यांच्यापासून किरण शांताराम ( प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, निर्माते), राजश्री आणि तेजश्री अशी तीन अपत्ये झाली. परंतु कालांतराने व्ही शांताराम आणि जयश्री यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान व्ही शांताराम यांनी अभिनेत्री संध्या यांच्यासोबत तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला त्यांच्या पहिल्या पत्नी विमलाबाई यांची देखील अनुमती मिळाली असल्याचे सांगितले जाते.व्ही शांताराम आणि संध्या याना एकही अपत्य झाले नाही परंतु त्यांची हीच सात मुले त्यांनी आपलीच समजून त्यांचा सांभाळ केला. लग्नानंतर संध्या आणि विमलाबाई ह्या दोघीनीही एकमेकांना समजून घेत शेवटपर्यंत साथ दिली. व्ही शांताराम यांचे निधन झाल्यानंतर काही वर्षांनी विमलाबाई यांचे देखील निधन झाले.
काही वर्षांपूर्वी संध्या या बऱ्याच इव्हेंटदरम्यान आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु आता वयोपरत्वे अशा कार्यक्रमात त्या जरा कमीच वावरू लागल्या. आजही त्यांच्यावर चित्रित झालेली ” मला लागली कुणाची उचकी “, “अरे जारे हट नटखट ” या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *