अजरामर चित्रपट “अशी ही बनवाबनवी” मराठी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी चित्रपट ठरला होता आणि बघता बघता चित्रपटाने तब्बल ३ कोटींची कमाई केली विशेष म्हणजे त्याकाळी फक्त ३ रुपयांच्या तिकिटावर ३ कोटींची कमाई होणे म्हणजे रेकॉर्डच होता. “अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनयाच्या जोरावर मराठी माणसाच्या मनात एक वेगळीच छाप पाडली असल्याचे आढळून येते. चौघा मित्रांना केवळ राहण्यासाठी भाड्याने घर मिळावे यासाठी केलेली खटाटोप या चित्रपटात दिसून आली.

शेवटी “जोडप्यांसाठीच भाड्याने घर देणार” असा अट्टाहास व्यक्त करणाऱ्या “लिलाबाई काळभोर” या बंगल्याच्या मालकीण त्यांना भेटल्या. या हट्टामुळे लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी साकारलेली स्त्री वेशभूषा सुध्दा चांगलीच गाजलेली पाहायला मिळाली.
या चित्रपटात लिलाबाई काळभोर यांची व्यक्तिरेखा “नयनतारा व्होरा ” यांनी साकारली होती. त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…. नयनतारा यांचा जन्म १९४० साली झाला. नाट्य आणि सिने सृष्टीत त्यांनी आपला चांगलाच जम बसवला होता. इथे भेटलात ते भेटलात, कार्टी प्रेमात पडली, स्मार्ट वधू पाहिजे यासारख्या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षणीय ठरल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या “शांतेच कार्ट चालू आहे” नाटकात त्यांनी त्यांच्या आईची भूमिका बजावली होती. ही भूमिका प्रचंड गाजली आणि यामुळेच त्यांना अशाच भूमिका चित्रपटात मिळाल्याने ‘लक्ष्याची आई’ म्हणूनच त्या ओळखू लागल्या.आई पाहिजे, आधार, खुळ्यांचा बाजार, तू सुखकर्ता, धांगडधिंगा, बाळा गाऊ कशी अंगाई यासारख्या चित्रपटात त्यांनी विनोदी तसेच गंभीर भूमिकाही त्यांनी साकारल्या.

बरीच वर्ष नयनतारा ह्या मधुमेहाने त्रस्त होत्या त्यातच त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि पुढे मधुमेहामुळे त्यांचा एक पाय निकामी झाल्यामुळे कापण्यात आला, त्यामुळेच त्या १० वर्षे सिने सृष्टीपासून बाजूला राहिल्या. अखेर ३० नोव्हेंबर २०१४ साली त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनि साकारलेली “शांतेच कार्ट चालू आहे” या नाटकातील आणि “अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील ‘लिलाबाई काळभोर’ यांची भूमिका प्रेक्षकांच्या तितकीच स्मरणात राहील एवढे नक्की.. अश्या ह्या हरहुन्नरी आणि अष्ठपैलू अभिनेत्रीला आमचा मनाचा मुजरा मराठी सिनेसृष्टी तुम्हाला कधीही विसरणार नाही अशी खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *