दादा कोंडके हे मराठी सिने सृष्टीतील मोठं नाव . दादा कोंडके यांचा पुण्यातील खडकवासला परिसरातील गोऱ्हे गावाजवळ तब्बल ९० एकर परिसरात डी के स्टुडिओ आणि बंगला आहे. दादा कोंडके यांनी १९९८ च्या अंतिम मृत्युपत्रात ही मालमत्ता त्यांच्या जवळच्या पाच सहकाऱ्यांमध्ये एक्झिक्युट केली होती. त्या पाचामध्ये अभिनेत्री उषा चव्हाण यांचा समावेश आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही मालमत्ता लँडमाफिया कब्जा करू पाहत असल्याच्या बातमीने अभिनेत्री उषा चव्हाण त्रासलेल्या पाहायला मिळाल्या.

गेल्याच वर्षी त्यांनी आपले स्वहस्ताक्षरीत असलेले एक पत्र देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. नावाची बदनामी करून धमकावणे, दहशत बसावी म्हणून अंगावर गाडी घालणे, स्टुडिओच्या दर्शनी भागात बेकायदेशीर रित्या बांधकाम करणे, रस्ता बंद करणे या ना अशा अनेक प्रकारे त्यांना कसा त्रास दिला जात आहे याची माहिती त्यांनी समोर आणली होती. काही वृत्तपत्रांनी त्यांची ही बाब उचलूनदेखील धरली होती. ही मालमत्ता “ना विकास झोन”, “हेरिटेज” मध्ये टाकावी अशी मागणी त्यांनी कोर्टात दाखल केली. दादांच्या स्वप्नपूर्ती साठीच्या त्यांच्या या कायदेशीर लढ्याला सरकारनेही सहकार्याची भूमिका घेतली.
उषा चव्हाण यांचे पुण्यात धनकवडी येथे “उषा पॅलेस “नावाने कार्यालय आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या या पॅलेस समोर अनधिकृतरित्या एक टपरी बसवण्यात आली. त्रास देणाऱ्याने ही टपरी एका मध्यरात्री अवघ्या ५ मिनिटातच तेथे उभारली असल्याची धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली होती. यासंदर्भात त्यांनी सरकारकडे ती टपरी हटवण्याची मागणी (इमेल द्वारे) केली. त्याची दखल शासनाने घेतली असल्याची माहिती त्यांना कळवण्यात आली. शिवाय ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्री यांच्यापर्यत पोहोचवली असल्याचे मेलद्वारे कळवण्यात आले परंतु इतके दिवस होऊनही अद्याप या गोष्टीवर कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचा पाठपुरावा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जिथे एका प्रसिद्ध कलाकारालाही अशा संकटांना सामोरे जावे लागते ह्याची खंत चाहत्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या लढ्याला निश्चित यश मिळो एवढी एक माफक अपेक्षा इथे व्यक्त करावीशी वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *